अंहकार
*अहंकार कसला करताय?* लेखक सुनिल जाधव, पुणे 9359850065
देवाला घातलेला हार सुद्धा संध्याकाळी निर्माल्य होतो.
कधी विचार केलाय?
आपण किती जपून, किती श्रद्धेने तो हार बनवतो. सुंदर फुलं निवडतो, दोरा ओवतो, आणि देवाच्या गळ्यात घालतो. दोन क्षण तो हार देवाच्या मूर्तीवर शोभून दिसतो. लोक हात जोडतात. फोटो काढतात.
पण संध्याकाळ झाली की,
तोच हार खाली काढला जातो. सुकलेला, कोमेजलेला. आणि थेट कचऱ्यात, निर्माल्याच्या टोपलीत.
ज्या हाराने देवाला सजवलं, त्याचीही हीच गत. तर मग आपण माणसं कसला अहंकार बाळगायचा?
आपला अहंकार कशाचा असतो?
रूपाचा? आज आहे, उद्या सुरकुत्या पडणार आहेत.
पैशाचा? आज खिशात आहे, उद्या बाजारात आहे.
पदाचा? आज खुर्ची आहे, उद्या ती दुसऱ्याची आहे.
ज्ञानाचा? आपल्याला वाटतं आपल्याला सगळं कळतं, पण आयुष्य एका क्षणात आपलं अज्ञान दाखवून देतं.
आपण फुलांसारखेच आहोत. सकाळी टवटवीत, दुपारी थोडे कोमेजलेले, आणि संध्याकाळी गळून पडलेले. फरक एवढाच, फुलांना हे माहीत असतं की आपल्याला गळायचंय, म्हणून ती उमलताना सगळ्यांना सुगंध देतात. आपल्याला मात्र वाटतं आपण कायम आहोत, म्हणून आपण काटे टोचत राहतो.
अहंकार बाजूला ठेवून माणूस म्हणून जगा, याचा अर्थ काय? तर ,
माणूस म्हणून जगणं म्हणजे मोठं काही नाही.
रस्त्यात कोणी पडलं तर हात देणं.
एखाद्याच्या डोळ्यात पाणी आलं तर 'काय झालं?' एवढं विचारणं.
आपल्यापेक्षा लहान माणसाशीही "तुम्ही" म्हणून बोलणं.
"माझ्यामुळे झालं" पेक्षा "आपल्यामुळे झालं" म्हणणं.
हाराचं भाग्य हेच आहे की तो देवाच्या गळ्यापर्यंत पोहोचतो, आणि तरीही तो शेवटी मातीत मिसळतो. त्याला कधी गर्व झाला नाही की मी देवाच्या गळ्यात आहे.
आपण तर देवही नाही आणि हारही नाही. आपण फक्त हारातला एक दोरा आहोत. जो फुलांना एकत्र बांधून ठेवतो.
तो दोरा तुटला की फुलं विखुरतात. अहंकार त्या दोऱ्याला तुटवतो. आणि नम्रता त्याला घट्ट करते.
म्हणून एकदा आरशात बघा. तुम्ही दिसाल, पण तुमचा अहंकार दिसणार नाही. कारण तो आरशात नाही, तो तुमच्या नजरेत आहे. नजर बदला, माणसं सुंदर दिसायला लागतील.
शेवटी कचऱ्यात हार नाही जात, अहंकार जातो.
माणूस मात्र मनात राहतो.
सुनिल जाधव पुणे, 93598 50065
Comments
Post a Comment