अंहकार
*अहंकार कसला करताय?* लेखक सुनिल जाधव, पुणे 9359850065 देवाला घातलेला हार सुद्धा संध्याकाळी निर्माल्य होतो. कधी विचार केलाय? आपण किती जपून, किती श्रद्धेने तो हार बनवतो. सुंदर फुलं निवडतो, दोरा ओवतो, आणि देवाच्या गळ्यात घालतो. दोन क्षण तो हार देवाच्या मूर्तीवर शोभून दिसतो. लोक हात जोडतात. फोटो काढतात. पण संध्याकाळ झाली की, तोच हार खाली काढला जातो. सुकलेला, कोमेजलेला. आणि थेट कचऱ्यात, निर्माल्याच्या टोपलीत. ज्या हाराने देवाला सजवलं, त्याचीही हीच गत. तर मग आपण माणसं कसला अहंकार बाळगायचा? आपला अहंकार कशाचा असतो? रूपाचा? आज आहे, उद्या सुरकुत्या पडणार आहेत. पैशाचा? आज खिशात आहे, उद्या बाजारात आहे. पदाचा? आज खुर्ची आहे, उद्या ती दुसऱ्याची आहे. ज्ञानाचा? आपल्याला वाटतं आपल्याला सगळं कळतं, पण आयुष्य एका क्षणात आपलं अज्ञान दाखवून देतं. आपण फुलांसारखेच आहोत. सकाळी टवटवीत, दुपारी थोडे कोमेजलेले, आणि संध्याकाळी गळून पडलेले. फरक एवढाच, फुलांना हे माहीत असतं की आपल्याला गळायचंय, म्हणून ती उमलताना सगळ्यांना सुगंध देतात. आपल्याला मात्र वाटतं आपण कायम आहोत, म्हणून आपण काटे टोचत राहतो. अह...