माणसाला आयुष्यात खरोखर काय पाहिजे असतं…?लेखक : सुनिल पुणे TM
माणसाला आयुष्यात खरोखर काय पाहिजे असतं…?
लेखक : सुनिल पुणे TM
माणसाच्या आयुष्यातल्या इच्छांची यादी पाहिली, तर पहिल्या रांगेत पैसा, बंगला, मोटारगाडी, वैभव, प्रतिष्ठा… हे सगळं दिसतं. कारण जगण्याच्या गरजा पूर्ण करायला या गोष्टींची नक्कीच गरज असते. पण मनाला विचारलं, तर ते अगदी वेगळंच उत्तर देतं. मनाच्या गणितात संपत्तीची मोजमापं चालत नाहीत… तिथं चालते ती भावनांची देवाणघेवाण, मन:शांतीचं मूल्य आणि नात्यांच्या ऊबेत मिळणारं खरं समाधान.
खरं सांगायचं तर, माणसाला फार काही नको असतं…
थोडं प्रेम, थोडी सोबत, थोडी समजूत असली की, सर्व जग सुंदर वाटायला लागतं.
प्रामाणिक प्रेम म्हणजे मनाला लागलेला थंडगार मलम;
जिथं स्वार्थाचा वास नसतो, अपेक्षांचे ओझे नसते,
फक्त मनापासून जपणारी माणसं असतात.
सोबत म्हणजे हातात हात नसेल तरी चालेल…
पण कोणीतरी "मी आहे तुझ्यासोबत" असं म्हणावं,
हेच मनाला सर्वात मोठे बळ देते, आधार देतं.
आणि ‘आपली माणसं’…
ही तर परमसुखाची चावीच जणू!
ज्यांच्यासमोर आपण मुखवटे काढून जगू शकतो,
रडू शकतो, हसू शकतो, मन मोकळं करू शकतो.
त्यांच्यासोबतचा एक कप चहा
हा लाखो रुपयांच्या आनंदापेक्षा जास्त मौल्यवान असतो.
जीवनात खरोखर श्रीमंत तोच माणूस आहे,
ज्याच्याकडे मन जपून ठेवणारी माणसं असतात.
बाकी पैसा, वैभव, वस्तू…
या आयुष्याच्या आरामासाठी असतात, आनंदासाठी नाही.
खरं पाहिजे असतं ते मनाला हसवणारे शब्द,
आपल्यासाठी मनात जागा ठेवणारी माणसं, आपुलकी
आणि अंधारातही हात धरून चालणारी एक खरी साथ…
कारण शेवटी जगण्याची शोभा
‘किती मिळवलं’ याने होत नाही, तर
‘किती मनांमध्ये घर केलं’
याने होते.
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment