कुटाना
"कुटाना" – एक शब्द, हजार संशय !
लेखक : सुनिल पुणेTM 93598 50065
मराठी भाषेतील काही शब्द असे असतात की त्यांचा शब्दकोशात अर्थ शोधायला जाऊ नका. कारण त्यांचा खरा अर्थ लोकांच्या चेहऱ्यावर, नजरेत आणि कुजबुजीत सापडतो. त्यापैकीच एक भन्नाट शब्द म्हणजे "कुटाना".
हा शब्द कानावर पडला की समोरच्याच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटतं. कुणी सरळ अर्थ सांगत नाही, पण सगळ्यांना अर्थ कळलेला असतो. गावातील चौक असो, शहरातील कट्टा असो किंवा व्हॉट्सॲप ग्रुप असो, एखाद्या व्यक्तीच्या नावापुढे "कुटाना" हा शब्द जोडला की चर्चेला उधाण येतं.
खरं तर हा शब्द जन्माला येतो तो संशयातून. नवरा जरा जास्त फोनवर बोलू लागला, पत्नी अचानक सजूनधजून बाहेर जाऊ लागली, मोबाईलला पासवर्ड लागला, रात्री उशिरा "ऑफिसचं काम" वाढलं की समाजातील काही स्वयंघोषित गुप्तहेर लगेच निष्कर्ष काढतात "काहीतरी कुटाना चाललंय!"
आपल्या समाजात एक गंमत आहे. लोकांना स्वतःच्या घरातील गळणारा नळ दिसत नाही, पण शेजाऱ्यांच्या घरातील पडदा जरा हलला तरी त्यामागची कथा तयार होते. आणि मग अफवांचा कारखाना सुरू होतो.
काही जण तर इतके तज्ज्ञ असतात की दोन माणसं एकत्र चहा पिताना किवा बाईक वर डबल सीट दिसली तरी त्यांना प्रेमकथा दिसते वा "कुटाना" वाटतो . एखाद्याने फेसबुकवर हार्ट इमोजी टाकला की लग्न मोडल्याच्या बातम्या तयार होतात. जणू काही जगातील प्रत्येक मैत्रीचा शेवट प्रेमातच होतो!
पण या "कुटाना" शब्दाच्या मागे एक गंभीर बाजूही आहे. अनेकदा नात्यांमध्ये संवाद कमी झाला, विश्वास ढासळला, एकमेकांना वेळ मिळेनासा झाला की गैरसमज वाढतात. काही वेळा खरोखरच विवाहबाह्य संबंध निर्माण होतात, पण अनेक वेळा केवळ संशयामुळेही संसार उद्ध्वस्त होतात.
संशय हा असा किडा आहे की तो सत्यापेक्षा वेगाने पसरतो. आणि एकदा तो मनात घर करून बसला की प्रेम, विश्वास आणि आपुलकी यांना खाऊन टाकतो.
म्हणून "कुटाना" हा शब्द ऐकला की हसायला हरकत नाही, पण त्यामागचा संदेश विसरू नये. नातं टिकवायचं असेल तर मोबाईल तपासण्यापेक्षा मन समजून घ्या. चौकशी करण्यापेक्षा संवाद साधा. आणि अफवा पसरवण्यापेक्षा सत्य जाणून घ्या.
कारण शेवटी प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे "कुटाना" नसतं, कधी कधी फक्त मैत्री असते, काम असतं किंवा साधं आयुष्य जगण्याची धडपड असते. आणि हो...गावात, शहरात, ऑफिसमध्ये किंवा सोसायटीत कुणीही "कुटाना" शोधत फिरत असेल, तर त्याला एकच सल्ला द्या,
"दुसऱ्यांच्या संसारात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या संसारात प्रेम वाढवा; मग 'कुटाना' हा शब्द फक्त विनोदातच उरेल!"
लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065, topsunil@gmail.com
Comments
Post a Comment