“मन रिकामं झालं की माणूस बाहेर आधार शोधू लागतो.
“मन रिकामं झालं की माणूस बाहेर आधार शोधू लागतो. ”
लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065
लग्न झालं, संसार सुरू झाला, मुलं झाली म्हणजे आयुष्यात प्रेमाची गरज संपते असं अजिबात नसतं. उलट त्या टप्प्यावर माणसाला अधिक भावनिक आधाराची गरज असते. कारण जबाबदाऱ्या वाढतात, ताण वाढतो आणि आयुष्य हळूहळू धावपळीचं बनतं. अशा वेळी जोडीदाराकडून मिळणारा आदर, जिव्हाळा, समजून घेणं आणि दोन प्रेमाचे शब्द माणसाला आतून उभारी देतात. पण अनेकदा संसार सांभाळताना हीच गोष्ट नकळत हरवत जाते.
आज अनेक घरं बाहेरून सुखी दिसतात. सगळं व्यवस्थित असतं घर, पैसा, मुलं, जबाबदाऱ्या. पण त्या घरात मनाने जवळ असणं हरवलेलं असतं. संवाद कमी होतो, एकमेकांना वेळ देणं कमी होतं आणि नातं फक्त रोजच्या कामापुरतं उरतं. “काय हवं ? ”, “जेवलास का?” इतकाच संवाद उरतो. पण माणसाला फक्त सुविधा नको असतात, त्याला भावना हव्याच असतात.
काही वेळेला पुरुष असो किंवा स्त्री, त्यांना घरात सतत दुर्लक्ष मिळतं. त्यांचं बोलणं ऐकलं जात नाही, भावना समजून घेतल्या जात नाहीत. फक्त चुका दाखवल्या जातात किंवा जबाबदाऱ्या आठववल्या जातात. अशावेळी माणूस आतून एकटा पडतो. आणि जेव्हा कुणीतरी बाहेरचं व्यक्तिमत्त्व त्याला समजून घेतं, शांतपणे ऐकतं, त्याचा आदर करतं, तेव्हा मन नकळत त्या व्यक्तीकडे ओढलं जातं.
हे नेहमीच शरीराचं आकर्षण असतं असं नाही. खरं प्रेम अनेकदा मनातून सुरू होतं. समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेते, आपली किंमत करते, आपल्याला महत्त्व देते ही भावना माणसाला भावनिक आधार देते. काही नाती शरीरापलीकडे जाऊन फक्त मनाने जोडली जातात.
अर्थात, याचा अर्थ संसाराबाहेरचं नातं योग्य ठरतं असं नाही. विश्वास तुटणं कधीच चांगलं नसतं. पण प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं हेही नाकारता येत नाही. अनेकदा नातं एका दिवसात तुटत नाही; ते हळूहळू दुर्लक्ष, अबोला आणि भावनिक अंतरामुळे कमजोर होत जातं.
म्हणून संसार टिकवायचा असेल तर फक्त पैशांची किंवा शारीरिक गरजांची पूर्तता पुरेशी नसते. नात्यात प्रेम, संवाद, आदर आणि एकमेकांसाठी वेळ असणं खूप गरजेचं असतं. आपल्या जोडीदाराला गृहीत धरू नका. त्यांचं मन समजून घ्या, त्यांना वेळ द्या, त्यांचं कौतुक करा. कारण बाहेरचं आकर्षण काही क्षणांचं असू शकतं, पण प्रेमाने जपलेला संसार आयुष्यभराची ताकद बनतो.
सुनिल पुणे TM 9359850065, topsunil@gmail.com
Comments
Post a Comment