बाई, बाटली आणि शबाब

"बाटली, बाई आणि शबाब" !
ही तीन शब्दं फक्त व्यसनाची ओळख नाहीत, तर माणसाच्या मनात चालणाऱ्या युद्धाची तीन रूपं आहेत.
एका बाजूला मोह, दुसऱ्या बाजूला एकटेपणा आणि तिसऱ्या बाजूला स्वतःपासून पळण्याची धडपड..... लेखक सुनिलTM 93598 50065 


बाटली, बाई आणि शबाब

जेव्हा शहरात रात्र होते, 
तेव्हा काही दिवे फक्त रस्ते उजळत नाहीत, ते अनेक आयुष्यांची अंधारी कहाणी लपवत असतात.

एखादा माणूस हातात बाटली घेऊन बसलेला दिसतो तर
लोक म्हणतात,  “दारुड्या आहे तो.” पण कुणी त्याच्या डोळ्यांत डोकावून पाहत नाही. कारण तिथे अनेक अपूर्ण स्वप्नं पडलेली असतात.

काही पुरुषांना “बाईच्या मागे वेडे” म्हणतात. पण प्रत्येक आकर्षणामागे वासना नसते,
कधी कधी ती मायेची भूक असते, जी त्याला आयुष्यभर कुणाकडूनच मिळालेली नसते आणि “शबाब”
तो फक्त तारुण्याचा नशा नसतो, तर स्वतःला जगात सिद्ध करण्याचा उन्माद असतो.
ज्यात माणूस स्वतःलाच हरवून बसतो.


"बाटली" कधीच कोणाला बुडवत नाही तर माणूस आधीच आतून बुडालेला असतो.
बाटली फक्त त्याला काही क्षणांसाठी विसरायला शिकवते.

जगात प्रत्येक नशेबाजाच्या मागे एक तुटलेलं नातं,
एक हरलेलं प्रेम,
किंवा एक अपमानित आत्मा असतो आणि समाजाला त्याची नशा दिसते,
पण त्याचं कारण दिसत नाही.

बाई !
ती माणसाला उध्वस्तही करू शकते आणि घडवूही शकते.

एका स्त्रीच्या प्रेमाने
फुटपाथवरचा माणूस साम्राज्य उभं करू शकतो 
आणि तिच्या विश्वासघाताने
राजासुद्धा रस्त्यावर येऊ शकतो.

पण खरी शोकांतिका इथे आहे, पुरुष बहुतेक वेळा स्त्रीवर प्रेम करत नाही,
तो तिच्याकडून स्वतःची रिकामी जागा भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो.
म्हणूनच जेव्हा ती निघून जाते,
तेव्हा त्याचं फक्त प्रेम तुटत नाही, त्याचा स्वतःवरचा विश्वासही मरून जातो.

आणि मग सुरू होतो शबाब !

पैसा, पार्ट्या, प्रसिद्धी, शरीरसुख, रात्रभर चालणाऱ्या मैफिली
हे सगळं बाहेरून चमकत असतं, पण आतून माणूस हळूहळू पोकळ होत असतो.
कारण जगातली सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे क्षणिक सुखाला कायमस्वरूपी आनंद समजणं.

आजच्या जगात लोकांना नात्यांपेक्षा “फीलिंग्स” हव्यात.
प्रेमापेक्षा “अटेन्शन” हवंय.
आणि आत्म्यापेक्षा शरीर अधिक महत्त्वाचं वाटायला लागलंय. म्हणूनच आज माणूस
लोकांमध्ये राहूनही एकटा आहे.

बाटलीची नशा सकाळी उतरते, बाईची नशा काही वर्षांनी उतरते, पण शबाबाची नशा उतरली की आरशात स्वतःचाच अनोळखी चेहरा दिसतो.
तेव्हा समजतं आपण आयुष्य जगलो कमी आणि स्वतःपासून पळालो जास्त.

खरं तर,
माणसाला बाटलीची गरज नसते.
त्याला समजून घेणाऱ्या खांद्याची गरज असते.
त्याला प्रत्येक वेळी बाई नको असते. कधी कधी फक्त विश्वास हवा असतो आणि त्याला शबाबही नको असतो
त्याला स्वतःच्या अस्तित्वाची किंमत जाणवायची असते.

जीवनाचा सर्वात मोठा नशा
दारूत नाही, शरीरात नाही,
तर शांत मनात असतो.
ज्यादिवशी माणूस स्वतःसोबत आनंदाने जगायला शिकतो,
त्यादिवशी बाटली हरते.
वासना हरते.
आणि खोटा शबाबही हरतो.

कारण शेवटी
माणूस नशेमुळे संपत नाही.
तो स्वतःला विसरल्यामुळे संपतो.

लेखक: सुनिल पुणेTM 9359850065, topsunil@gmail.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

पहिलं प्रेम चुकीच्या व्यक्तीशी तर दुसरं प्रेम चुकीच्या वेळेला होते...