"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"
*"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"*
लेखक: सुनिल पुणे TM 8007939422
माणूस जन्मतःच भावनांनी भरलेला असतो. प्रेम, आपुलकी, माया, आणि जवळीक हे त्याच्या स्वभावाचे अविभाज्य घटक असतात. आपण कोणालातरी जीव लावतो, आपलं म्हणतो, त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. पण अनेकदा याच ‘जीव लावण्याच्या’ भावना आपल्यालाच त्रासदायक ठरतात, जेव्हा समोरचा त्या भावनांची कदर करत नाही.
कुठल्याही नात्यांमध्ये समतोल हवा. आपण जर अती जीव लावायला लागलो, तर अनेकदा समोरच्याच्या मनात आपल्याविषयीचा आदर कमी होतो. जेव्हा आपण त्यांच्यासाठी सर्व काही करत राहतो, स्वतःच्या गरजा विसरतो, त्यांच्या प्रत्येक हाकेला धावून जातो – तेव्हा हळूहळू आपल्याला ‘समजून घेणं’ थांबतं आणि 'गृहित धरलं जातं’.
अति जीव लावल्यावर जेव्हा समोरचा माणूस आपल्याला पायपुसणं समजतो, तेव्हा दुःख होतं. कारण आपण मनापासून दिलं असतं – वेळ, भावना, आधार – आणि त्या बदल्यात मिळतो उपेक्षेचा शेला.
म्हणूनच, नाती असोत की मैत्री – प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा हवीच. जीव लावा, प्रेम करा, साथ द्या – पण स्वतःला हरवून नाही. स्वतःचा स्वाभिमान, आपली किंमत ही जपली गेली पाहिजे. ज्यांना आपला खराखुरा जीव लागतो, ते आपल्याला समजून घेतात. उरलेले आपल्याला फक्त ‘सोय’ म्हणून वापरतात.
आजच्या घडीला गरज आहे ती समतोलाची. ना कोरडेपणा, ना अति भावनिकता – तर समजून घेणं आणि योग्य अंतर ठेवून आपलंपण जपणं. कारण आपण जर स्वतःलाच जपलं नाही, तर जग आपल्याला कधीच जपणार नाही.
सुनिल पुणे TM 9359850065
(परिक्षक, छायाचित्रकार, मार्गदर्शक, आणि जीवन निरीक्षक)
Comments
Post a Comment