दुसर्‍यांचे दोष शोधायची सवय असेल, तर आधी स्वतःचे दोष शोधा.

दुसर्‍यांचे दोष शोधायची सवय असेल, तर आधी स्वतःचे दोष शोधा.
लेखक : सुनिल पुणेTM 9359850065.

“बुराई शोधण्याचा शौक असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, दुसऱ्यांपासून नाही” कारण  या एका साध्या वाटणाऱ्या विचारात आयुष्याचा मोठा धडा दडलेला आहे. आज आपण ज्या समाजात जगतो, तिथे दुसऱ्यांच्या चुका शोधणे हा जणू काही छंदच झाला आहे. कोण काय बोललं, कोण कसं वागलं, कोणाचं आयुष्य कसं आहे, यावर चर्चा करायला आपण नेहमी तयार असतो; पण स्वतःकडे पाहण्याची वेळ आली की आपण मात्र नजरा चुकवतो.

दुसऱ्यांमध्ये दोष शोधणे खूप सोपं असतं. कारण त्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज नसते. फक्त टीका करायची, तुलना करायची आणि स्वतःला श्रेष्ठ समजायचं. पण खरा विकास तिथे सुरू होतो, जिथे आपण स्वतःच्या कमतरता मान्य करतो. स्वतःच्या चुका स्वीकारणं ही कमजोरी नसून ती प्रगल्भतेची निशाणी आहे.

आपण अनेकदा म्हणतो, “समाज बदलला पाहिजे.” पण समाज म्हणजे नेमकं कोण? आपणच ना! जर प्रत्येकाने स्वतःपासून बदलाची सुरुवात केली, तर समाज आपोआप बदलू लागेल. दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या स्वभावातील कठोरपणा, अहंकार, मत्सर, आळस, दुर्लक्ष हे दोष आपण  ओळखले, तर आपल्याला कळेल की सुधारण्यासाठी किती काही बाकी आहे.

आरसा कधीही खोटं बोलत नाही. तो जे आहे तेच दाखवतो. पण आपण आरशात पाहताना चेहरा नीट करतो; मन मात्र जसं आहे तसं ठेवतो. बाह्य रूप नीटनेटके करण्याइतकंच अंतर्मन शुद्ध करणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दाखवण्यापेक्षा स्वतःच्या मनातला अंधार दूर करणं अधिक गरजेचं आहे.

दोष दाखवणं सोपं आहे; गुण ओळखणं अवघड आहे. म्हणूनच आपण सहज दोषांवर बोट ठेवतो. परंतु जर आपण ठरवलं की आजपासून दुसऱ्यांमध्ये चांगुलपणा शोधायचा आणि स्वतःमध्ये उणिवा शोधायच्या, तर आयुष्याचा दृष्टिकोनच बदलेल. आपली नाती सुधारतील, संवाद सुसंवादी होईल आणि मन अधिक शांत होईल.

खरं तर, जो माणूस सतत दुसऱ्यांमध्ये दोष शोधत राहतो, तो नकळत स्वतःच्या कमतरता झाकण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला भीती असते ती ही की कुणी त्याच्या उणिवा पाहू नयेत. पण जो धैर्याने स्वतःकडे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो.

आपण आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना, सहकाऱ्यांना नेहमी शिकवतो की, “चांगले बना.” पण त्यासाठी आपण स्वतः किती प्रयत्न करतो? उपदेश देण्यापेक्षा उदाहरण देणं अधिक प्रभावी असतं. जर आपण स्वतःमध्ये प्रामाणिकपणा, संयम, नम्रता आणि माणुसकी जपली, तर आपल्या वर्तनातूनच इतरांना दिशा मिळेल.

जीवनात प्रगती करायची असेल तर आत्मपरीक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे. रोज रात्री दोन मिनिटं स्वतःला प्रश्न विचारूया, “आज मी कोणाची मन दुखावली का?”, “मी कुठे चुकलो?”, “उद्या मी काय सुधारू शकतो?” या साध्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला अधिक सजग बनवतील.

दुसऱ्यांवर बोट ठेवताना आपली तीन बोटं आपल्याकडेच वळलेली असतात, ही गोष्ट विसरू नये. म्हणूनच दोष शोधण्याची सवय असेल, तर आरसा आधी स्वतःकडे वळवूया. कारण स्वतःला सुधारलं की जग आपोआप सुंदर वाटू लागतं.

दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात आयुष्य घालवूया. हाच खरा सकारात्मक विचार, हाच खरा आत्मविकासाचा मार्ग.

लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065,  topsunil@gmail.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?