लग्न न झाल्यामुळे कोणी मरत नाही, पण चुकीच्या व्यक्तीशी लग्न झाल्यावर मात्र,
लग्न न झाल्यामुळे कोणी मरत नाही, पण चुकीच्या व्यक्तीशी लग्न झाल्यावर मात्र, रोज थोडं थोडं मरावं लागतं…
सुनिल पुणे TM 8007939422
लग्न म्हणजे दोन जीवांचं नातं, दोन कुटुंबांचं एकत्र येणं, आणि आयुष्यभरासाठीचा एक नाजूक पण जबाबदारीचा निर्णय. पण आज या समाजात स्त्रीवरच अधिक दबाव असतो तिच्या लग्नाच्या वयाचं, समाजाच्या नजरेचं, "कधी करणार?" या प्रश्नांचं ओझं. आणि मग, अनेकदा ती समाजाचं म्हणणं ऐकते, पण तिचं मन ऐकत नाही.
ती स्वतःला समजावत राहते…
"सगळेच परफेक्ट नसतात, थोडं सामजस्य हवं,"
"आई-बाबांचा मान ठेवावा लागतो,"
"कधीतरी सवय होईल…"
…पण चुकीच्या व्यक्तीशी लग्न झालं की, सवय तर होते, पण ती सवय नसते तर ती फक्त शरीराने जिवंत, पण आत्म्याने हरवलेली अवस्था असते.
प्रेमाचा उबदार हात नसेल, संवादाची साथ नसेल, समजून घेण्याची नाती नसतील, आणि सतत फक्त अपेक्षा, अपेक्षा, अपेक्षा…
तेव्हा स्त्री, जी मुळातच प्रेमासाठी, मायेच्या स्पर्शासाठी तळमळते… ती दिवसेंदिवस आतून कोसळत जाते.
ती घर सजवते, पण घरात आपलेपण नाही वाटत.
ती हसते, पण डोळ्यातील चमक हरवलेली असते.
ती जेवण वाढते, पण तिच्या ताटात नेहमीच एकटेपण वाढलेलं असतं.
ती रोज जिवंत असते, पण मनानं… रोज मरत असते.
नातं असतं, पण नात्याचं बंधन नसतं..फक्त त्याचे ओझं असतं.
शब्द असतात, पण संवाद नाही.
साथ असते, पण सहवास नाही.
चुकीच्या माणसाशी लग्न म्हणजे स्वतःच्याच स्वप्नांना फाशी देणं.
आणि त्या फाशीतून हसतमुखाने जगायचं नाटक करणं.
ह्या सगळ्यात तिचं "स्वतःपण" हरवतं. आणि शेवटी, ती फक्त “कोणी तरी पत्नी” म्हणूनच ओळखली जाते, "ती स्वतः" म्हणून नाही.
म्हणूनच म्हणतात …
लग्न न झालं तरी स्त्री तीच राहते अगदी स्वाभिमानी, मुक्त, स्वप्नाळू.
पण चुकीच्या माणसाशी लग्न झालं, की ती ‘स्वतः’ राहात नाही तर ती फक्त ‘समजूतदार’ होते.
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment