मुखवट्यांच्या जगातले खरे चेहरे...!
मुखवट्यांच्या जगातले खरे चेहरे...!
सुनिल पुणेTM 9359850065.
राजकारणातील मित्र, चित्रपटातील चित्र आणि नाटकातील पात्र… हे सर्व पाहताना मनाला भुरळ पडते, टाळ्यांचा कडकडाट होतो, भावना उसळतात; पण त्या सर्व गोष्टींच्या पाठीमागे एक सत्य दडलेले असते की बहुतेक वेळा तात्पुरत्या आणि कृत्रिम असतात. त्या रंगमंचावर झळकतात, पडद्यावर चमकतात, सभागृहात घोषणांनी गाजतात; पण आयुष्याच्या खऱ्या रणांगणात मात्र आपल्या सोबत उभे राहतात ते फक्त आपले जीवलग आणि सच्चे नातलग.
राजकारणात मैत्री असते, पण ती बहुतेकदा स्वार्थाच्या धाग्यांनी विणलेली असते. पद, प्रतिष्ठा आणि सत्ता या गोष्टींवर ती उभी असते. कालपर्यंत खांद्याला खांदा लावून चालणारे लोक आज मतभेदांमुळे एकमेकांसमोर उभे ठाकतात. या क्षेत्रातले संबंध हे परिस्थितीनुसार बदलतात. म्हणूनच ते कायमस्वरूपी नसतात.
चित्रपटातील चित्र आपल्याला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाते. हिरो हिरोईनचे प्रेम, त्यांची मैत्री, त्यांचे त्याग पाहून आपण भारावून जातो. पण कॅमेरा बंद झाला की त्या भावनांचाही शेवट होतो. पडद्यावरचे हसू, रडणे, प्रेम, हे सगळे अभिनयाचा भाग असतो.
नाटकातील पात्र तर अधिकच बोलके असते. रंगमंचावर ते जिवंत वाटते, त्याच्या वेदना आपल्याला जाणवतात; पण पडदा पडला की कलाकार आपला मुखवटा काढतो आणि पुन्हा आपल्या खऱ्या आयुष्यात परततो.
या सगळ्या कृत्रिम जगात एकच गोष्ट खरी असते की आपल्या आयुष्यातील सच्ची खरी माणसे. जी आपल्या यशात टाळ्या वाजवतात, पण अपयशात खांद्यावर हात ठेवतात. जी आपल्या आनंदात सामील होतात, पण दुःखात शांतपणे सोबत बसतात. जी आपल्या कमतरता जाणूनही आपल्याला स्वीकारतात.
जीवलग मित्र हे आरशासारखे असतात. ते आपल्याला आपले खरे रूप दाखवतात. ते चूक केली तर समजावतात, योग्य केले तर प्रोत्साहन देतात. त्यांच्याकडे कोणताही मुखवटा नसतो, कोणतीही बनावटपणा नसतो. त्यांची मैत्री ही जाहिरात नसते; ती मनापासूनची नाळ असते.
नातलगांबद्दलही हेच खरे आहे. रक्ताचे नाते असो वा मनाने जुळलेले नाते त्यात स्वार्थ नसतो, अपेक्षांचा अतिरेक नसतो. ते नाते संकटात कसोटीला उतरते आणि तेव्हाच त्याची खरी किंमत कळते.
आजच्या डिजिटल युगात आपण हजारो लोकांशी जोडलेले असतो. सोशल मीडियावर शेकडो “मित्र” असतात. पण संकटाच्या क्षणी फोन लावावा असा एक जिवलग मित्र असणे, हेच खरे संपत्ती असते.
म्हणूनच आयुष्यात बाह्य चमक-धमक पाहून भुलू नका. पद, पैसा, प्रसिद्धी यापेक्षा नात्यांची श्रीमंती मोठी असते. राजकारणातील मित्र बदलू शकतात, चित्रपटातील दृश्ये विसरली जातात, नाटकातील पात्रे पडद्यामागे जातात; पण जीवलग मित्र आणि प्रेमळ नातलग आयुष्यभर आपल्या हृदयात कोरलेले राहतात.
खरे नाते हे जाहिरात करत नाही, ते फक्त साथ देते. खरे प्रेम गाजावाजा करत नाही, ते शांतपणे उभे राहते.
आपणही अशा नात्यांना जपा, त्यांची कदर करा. कारण आयुष्याच्या शेवटी टाळ्यांचा आवाज नाही, तर खांद्यावर ठेवलेला आपुलकीचा हातच आठवतो.
सुनिल पुणेTM 9359850065, topsunil@gmail.com
Comments
Post a Comment