देवाची परीक्षा आणि साथ( लेखक -> सुनिल पुणे TM 8007939422 )
देवाची परीक्षा आणि साथ
( लेखक -> सुनिल पुणे TM 8007939422 )
जीवनात एक विचित्र पण अत्यंत गूढ सत्य आहे देव नेहमी चांगल्या लोकांची परीक्षा घेतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही.
आणि उलट वाईट लोकांना देव बरीच सुखं, संपत्ती, कीर्ती देतो, पण साथ कधीच देत नाही.
पहिल्या नजरेत पाहिलं तर आपल्याला हे अन्यायकारक वाटतं. “ज्याने कुणाचं वाईट केलं नाही, त्यालाच संकटं का?” असा प्रश्न मनात उठतो. पण इथंच देवाचं गणित वेगळं आहे.
देव चांगल्या माणसावर संकटं पाठवतो कारण तो जाणतो हा माणूस कोसळणार नाही, तो शिकेल, वाढेल, आणि इतरांना मार्ग दाखवेल.
त्याची परीक्षा म्हणजे शिक्षा नाही; ती त्याच्या सामर्थ्याची ओळख आहे. जशी सोनं तापवून शुद्ध केलं जातं, तसंच चांगल्या माणसाला आयुष्य तापवून तेजस्वी केलं जातं.
तर दुसरीकडे, वाईट माणसाला देव बरीच सुखं देतो, कारण त्याच्याकडून देवाला काही शिकवायचं नसतं. त्याला त्याच्या अहंकारातच बुडू देतो. देवाची “साथ” म्हणजे केवळ मदत नाही, ती एक अदृश्य शक्ती असते जी संकटात आपल्याला पाठीशी उभी राहते, ज्या क्षणी सगळं संपल्यासारखं वाटतं, तिथेच ती आपल्याला उचलून उभी करते.
जेव्हा चांगल्या माणसाच्या आयुष्यात दुःख येतं, तेव्हा देव म्हणतो “थोडं थांब, मी तुझी ओळख घडवत आहे.”
आणि जेव्हा वाईट माणूस उंच उडतो, तेव्हा देव शांतपणे पाहत असतो “थोडं थांब, गुरुत्वाकर्षणाला वेळ लागेल पण तो खाली येईलच.”
म्हणूनच संकट आलं की देवावर रुसू नका. ती त्याची शिक्षा नसते, ती त्याची उपस्थिती असते. कारण देव फक्त त्या माणसाची परीक्षा घेतो ज्याच्यावर तो विश्वास ठेवतो.
आणि जेव्हा ही परीक्षा संपते, तेव्हा त्याचं जीवन दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनतं.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं
देव चांगल्या लोकांना संघर्ष देतो, कारण तो त्यांचं भविष्य घडवत असतो.
वाईट लोकांना सुखं देतो, कारण त्यांचं भविष्य संपवत असतो.
म्हणून देवावरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका कारण परीक्षा संपली की त्याची साथ अधिक मजबूत रूपात तुमच्यासोबत उभी असते.
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment