आजच्या युगातील ‘डिजिटल भांडण’ आणि ‘रुसवा’ 'फुगवा'* *लेखक सुनिल पुणेTM.

*आजच्या युगातील ‘डिजिटल भांडण’ आणि ‘रुसवा’ 'फुगवा'* *लेखक सुनिल पुणेTM.*

आजच्या काळात मानवी भावना, नाती आणि रुसवेफुगवे यांचं स्वरूपच बदललंय. पूर्वी भांडणं तोंडासमोर व्हायची, संवाद व्हायचा, मध्यस्थ व्हायचे आणि शेवटी एक “चल सोडून दे रे आता!” इतकं ऐकून पुन्हा सगळं ठीक व्हायचं.
आता मात्र हे सगळं स्क्रीनच्या आत होतंय म्हणजेच ‘डिजिटल भांडण’ आणि ‘ऑनलाइन रुसवा’.

*डिजिटल नाती, डिजिटली तुटणं*

आज नाती संवादावर नाहीत, तर स्टेटस, मेसेज, आणि ब्लॉक बटणावर अवलंबून आहेत.
कोणी पोस्ट बघितली नाही तर राग,
लाईक केलं नाही तर संशय,
आणि रिप्लाय दिला नाही तर थेट “ब्लॉक”.
इतकं सगळं ऑनलाईन झालंय की प्रेमसुद्धा आता “टायपिंग…” इथंच अडकून राहतं.

*ग्रुप ॲडमिनची सत्ता व हुकुमत*

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स म्हणजे आजची छोटी राज्यं.
आणि ॲडमिन म्हणजे त्या राज्याचा राजा!
कोण राहणार, कोण जाणार, कोण बोलणार सगळं त्याच्या बोटांवर.
एखाद्या ग्रुपचं नाव “मैत्री सदैव” असलं तरी, ॲडमिनच्या मनाविरुद्ध बोललात की लगेच
"You were removed from the group.”...या एका क्लिकने नातं संपतं.
पूर्वी राजे तलवार चालवत, आज ॲडमिन ‘रिमुव्ह’ करतो एवढाच काय तो फरक!

*डिजिटल रुसवा फुगवा* 

पूर्वी रुसलेलं मन बोलून समजावायचं.
आता मात्र लोक थेट स्टेटस टाकतात “मन दुखलंय पण सांगणार नाही…”
किंवा
“Ignored once, forgotten forever.”
आणि दुसरा माणूस ते पाहून विचारात पडतो
हे माझ्यासाठी आहे का?
अशा प्रकारे संवादाऐवजी अंदाज चालतात, आणि नातं तुटतं.

*शुभेच्छा आणि ‘ऑनलाइन स्नेह’*

आज वाढदिवसाच्या शुभेच्छांमध्येही भावना नाहीत, फक्त फॉरवर्ड मेसेज आहे.
कोणी “Happy Birthday” नाही म्हटलं तर लगेच रुसवा,
कोणी फोटोवर कमेंट केली नाही तर मनात दुःख.
पूर्वी भेटवस्तू महत्त्वाच्या होत्या,
आता "लाईक" आणि "हृदय इमोजी" हेच मोजमाप झालंय नात्याचं.

*मग खरं नातं कोणतं बर ?*
डिजिटल जगाने आपल्याला जोडलं, पण मनं दूर केली.
आपण नेटवर्कमध्ये कनेक्ट झालो, पण भावनांमध्ये डिसकनेक्ट झालो.
खरं नातं तेच जे ऑफलाइन टिकतं,
जेव्हा फोन बंद असतो, इंटरनेट नसतं,
आणि तरीही माणूस आपल्या मनात असतो.

शेवटचा विचार एकच....

डिजिटल भांडणं आणि रुसवे आजच्या युगाचा भाग आहेत, पण त्यांचं मूळ संवादाचा अभाव आहे.
जर थोडं बोललो, थोडं ऐकलं, आणि थोडं समजून घेतलं
तर “ब्लॉक” करण्याऐवजी “हग” करणं शक्य आहे.
कारण शेवटी नाती *‘ऑनलाइन’ नाही, तर ‘मनातून’ जपली जातात.*

*दीपावलीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा*
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"