"स्त्री सर्व तुटलेल्या गोष्टी जोडणारी अदृश्य शक्ती" सुनिल पुणेTM
*"स्त्री सर्व तुटलेल्या गोष्टी जोडणारी अदृश्य शक्ती" सुनिल पुणेTM* 8007939422
शर्टाचं एक बटन निघून जातं, तेव्हा पुरुष थोडासा चिडतो… “हे सगळं त्रासदायक आहे,” असं म्हणत तो ते कपाटात टाकतो. पण त्याचं ते छोटं बटन, जेव्हा एखादी स्त्री प्रेमाने शिवते तेव्हा ती फक्त कपड्याचं तुटलेपण भरत नाही, तर त्याच्या मनातील हलकासा विस्कटलेला आत्मविश्वासही परत शिवते.
स्त्रीचं हे सामर्थ्य असं असतं की ती तुटलेलं काहीही जोडू शकते मग ते कपड्याचं बटन असो, घरातील नातं असो, किंवा एखाद्याचं मोडलेलं मन असो.
ती आपल्या मायेच्या सुईने, संयमाच्या धाग्याने, आणि प्रेमाच्या गाठीने जीवन पुन्हा सांधते.
पुरुष बाहेरच्या जगाशी झुंजतो, पण स्त्री त्या झुंजीतून आलेल्या थकव्याला शांत करण्याचं काम करते. तो पराभूत होऊन घरी येतो, आणि ती फक्त एक कप चहा देऊन, एक हळवा शब्द बोलून, त्याच्या डोळ्यात हरवलेला आत्मविश्वास परत आणते.
हा तिचा न दिसणारा पण सर्वात प्रभावी चमत्कार असतो.
पण समाजाला अजूनही ती कमजोरी वाटते. कारण समाज फक्त तिचं मौन पाहतो, तिची झुकलेली मान पाहतो, पण तिच्या त्या मूक सामर्थ्याची दखल घेत नाही.
ती जेव्हा शांत असते, तेव्हा ती हारलेली नसते ती विचार करत असते, कोण कसं सावरणं शक्य आहे याचा. ती जेव्हा रडते, तेव्हा ती कोसळत नाही ती मनातील वेदना धुवून टाकते, जेणेकरून दुसऱ्यांसाठी पुन्हा हसता येईल.
तिचं जगण्याचं तंत्र म्हणजे “तुटलेल्या गोष्टी टाकायच्या नाहीत, दुरुस्त करायच्या.”
म्हणूनच ती नात्यांतही तुटणं नको म्हणते. ती माफ करते, समजून घेते, सांभाळते.
ती प्रत्येक नात्याची न दिसणारी ‘सिलाई मशीन’ आहे जी गप्पच काम करते, पण तिच्या कामामुळे संपूर्ण घर, संपूर्ण आयुष्य टिकून राहतं.
स्त्री ही कमजोरी नाही ती ती शक्ती आहे, जिला सगळं तुटलेलं पुन्हा जोडता येतं.
तिच्या मायेचा एक धागा जरी आयुष्यात आला, तरी जीवनाचं वस्त्र पुन्हा नवीन होतं.
फरक एवढाच तिला नेहमी दुर्बल समजणाऱ्या समाजाने एकदा तिच्या सुईच्या टोकाकडे पाहावं,
कारण तिथेच आहे ती शक्ती जी प्रत्येक पुरुषाला पुन्हा उभं राहायला शिकवते.
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment