आयुष्याचा कठीण पेपर आणि भावनांची शाळा, सुनिल पुणेTM, 8007939422
आयुष्याचा कठीण पेपर आणि भावनांची शाळा, सुनिल पुणेTM, 8007939422
आपण आयुष्यभर ज्या गोष्टींचा अभ्यास करतो, त्या पुस्तकांत नसतात… त्या आपल्या मनात असतात, भावनांमध्ये असतात, संवेदनांमध्ये असतात. आपल्याला लहानपणापासून प्रेम, आपुलकी, विश्वास, माणुसकी, सहानुभूती या मूल्यांची शिकवण दिली जाते. आपण समजतो की हिच खरी ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. पण जेव्हा आयुष्याच्या अंतिम परीक्षेला आपण बसतो, तेव्हा पेपर भावनांचा नसून व्यवहारांचा आणि स्वार्थाचा निघतो. हेच आपल्या आयुष्याचं सर्वात कडू, पण सत्य वास्तव आहे.
भावनांचा अभ्यास केलेल्या मनाला जेंव्हा व्यवहाराची भाषा समोर दिसते, तेंव्हा मन कोसळतं… कारण जिथे आपण नात्यांमध्ये प्रेम शोधलं, तिथे दुसऱ्याने व्यवहार तपासला. आपण संबंध जपले, पण जगाने त्यांची किंमत तोलली. आपण दिलेलं मनापासून दिलं, पण जगाने ते व्यवहाराच्या दरात मोजलं.
हे आयुष्य म्हणजे भावनांची शाळा आणि व्यवहारांची परीक्षा आहे. इथे अभ्यास काही आणि प्रश्नपत्रिका काहीतरी वेगळीच असते.
आपण ‘माणूसपण’ शिकलो, पण जगाने विचारलं ‘यातून फायदा किती ?’
आपण ‘विश्वास’ दिला, पण जगाने विचारलं ‘हमखास परतावा आहे का?’
आपण ‘प्रेमाने हात पुढे केला’, पण जगाने पाहिलं ‘हा हात उपयोगाचा आहे का?’
इथे गुणपत्रिका भावनांनी नाही तर व्यवहारांनी ठरते. पैसा, प्रतिष्ठा, उपयोग, स्वार्थ यांच्यावरच निर्णय घेतले जातात. आणि आपण आश्चर्यचकित होऊन विचार करतो
"मी वेगळं काय केलं? मी तर सत्य, प्रेम आणि विश्वास शिकलो होता…"
पण इथेच आयुष्य आपल्याला सांगतं
“समजदार हो… हे जग भावनांनी नाही, व्यवहारांनी चालतं. भावनांनी जग उबदार होतं, पण व्यवहारांनी ते चालतं.”
माणसाला भावनांची जाणीव असली पाहिजे, कारण ती त्याला माणूस म्हणून ठेवते.
पण व्यवहाराचं भान असलं पाहिजे, कारण तेच त्याला जगात टिकवणारं शस्त्र ठरतं.
निष्कर्ष असा नाही की भावना चुकीच्या आहेत… पण भावना पुरेशा नाहीत.
व्यवहार नसलेली भावना म्हणजे संगीत. गीत बिना स्वर… आणि भावना नसलेला व्यवहार म्हणजे यंत्राचा आवाज होय.
जीवनाची खरी कला म्हणजे भावनांच्या हृदयातून व्यवहारांची दिशा शोधणे.
माणुसकीतून जगणे आणि समजुतीतून टिकणे.
कारण आयुष्याचा पेपर कठीण असतो, पण आपण भावनांचा आणि व्यवहारांचा योग्य समन्वय साधला, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या हातात असतं.
भावनांनी मन श्रीमंत होतं आणि व्यवहारांनी जीवन सुरक्षित होतं हेच आयुष्याचं अंतिम तत्त्वज्ञान आहे.
सुनिल पुणेTM, 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment