"सून" पण आधी "मुलगी" होती, हीच आता सासुची मुलगी बनेल का ? सुनिल पुणे TM*
*"सून" पण आधी "मुलगी" होती, हीच आता सासुची मुलगी बनेल का ? सुनिल पुणे TM*
आपल्या समाजात नेहमी एक वाक्य ऐकायला मिळतं “मुलगी नसली की म्हातारपणी आधार नाही मिळत.” पण आयुष्य अनुभव देतं तेव्हा हे वाक्य खोटं ठरल्याचंही अनेकदा जाणवतं.
आई-वडिलांच्या आयुष्यात मुलगा कमावतो, संसार उभा करतो, कुटुंबाचं नाव पुढे नेत राहतो. पण खरी माया, जिव्हाळा, आपलेपणाचा हात देणारी सून असते, हेही सत्य आहे. आईविषयीची जबाबदारी कधी कधी मुलगा नोकरी, व्यवसाय, व्यस्त जीवन या सगळ्यात गुंतून विसरतो. त्याला वृद्धाश्रम, सोयी-सुविधा हेच पर्याय सोपे वाटू लागतात. पण घराच्या उंबरठ्यावर आलेली सून जर हृदयाने समजूतदार असेल, तर तीच आईच्या हक्काची खरी मुलगी ठरते.
कारण आईने एकटीने मुलाला वाढवलं, त्याच्या प्रत्येक गरजेसाठी स्वतःला झिजवलं, पण मुलगा मोठा झाल्यावर जर तो आईला दूर ठेवण्याचा विचार करतो, तर ती वेदना शब्दात सांगता येत नाही. त्या वेळी सुनेचं मन मोठं होतं. तीच पुढे येऊन म्हणते “आईला दूर ठेवणं म्हणजे आपल्या संस्कारांचा अपमान आहे. पैसा कमावणं महत्त्वाचं असलं तरी आईच्या सहवासाची किंमत कधीच पैशात मोजता येत नाही.”
खरं पाहिलं तर सूनच आईची खरी जोडीदार ठरते आनंदात सोबत, दुःखात आधार आणि शेवटच्या क्षणी साथ देणारी. म्हणूनच अनेक आईंच्या ओठांवर हा आशीर्वाद उमटतो “देवा, मुलगी न दिल्याचं दुःख तू सुनेच्या रूपाने पुसून टाकलं आहेस.”
घरातली सून जर कळकळीची, समजूतदार आणि हृदयाने जुळलेली असेल, तर तीच आईसाठी भाग्यलक्ष्मी ठरते. आणि अशा वेळी आई म्हणते “माझं खरं यश मुलाच्या कमाईत नाही, तर मला अशी सून लाभण्यात आहे.”
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment