खऱ्या संपत्तीची गोष्ट....!सुनिल पुणेTM
खऱ्या संपत्तीची गोष्ट....!सुनिल पुणेTM
एक व्यापारी होता. दिवस-रात्र तो पैशाच्या मागे धावत होता. व्यवहार, नफा, आकडे..हेच त्याच्या आयुष्याचे केंद्रबिंदू झाले होते. खिशाचे वजन इतके वाढले होते की शहरात त्याची प्रतिष्ठा, नाव आणि मानमरातब सगळीकडेच झळकत होतं. पण घरात मात्र वेगळं चित्र होतं. मुलांना त्याच्याशी बोलायला वेळ नव्हता, पत्नीचे हसरे चेहरे हरवले होते, आणि जुने मित्र त्याच्यापासून दुरावले होते.
एके दिवशी व्यापाऱ्याने एक यशस्वी सौदा केला. लाखो रुपये हातात आले. घरी परतला, पण दारावर त्याचे स्वागत करणारे हसरे चेहरे नव्हते. शांतता होती, एकटेपणा होता. तेव्हा त्याला जाणवलं “मी खिशाचं वजन वाढवलं, पण नात्यांचं वजन घटवलं… हा तर खुपच मोठा तोटा ठरला!”
त्या रात्री त्याने स्वतःशीच संवाद साधला. त्याला उमगलं की खरी संपत्ती पैशात नसते, तर ती आपल्या नात्यांमध्ये दडलेली असते. मुलांसोबत घालवलेला वेळ, आई-वडिलांच्या पायाशी बसून केलेली दोन गप्पा, मित्रांसोबत केलेले हास्यविनोद, पार्टी, भटकंती, भांडण हेच तर खरे धन आहे. पैसा हा साधन आहे, पण नाती हीच खरी संपत्ती आहेत.
माणूस कितीही श्रीमंत झाला तरी, जर त्याच्याजवळ प्रेमळ कुटुंब आणि विश्वासू मित्र नसतील, तर तो आतून गरिबाच राहतो. पण ज्याच्याकडे नात्यांची उबदार छत्रछाया असते, तोच खरा श्रीमंत असतो.
म्हणून लक्षात ठेवा बँकेतील आकडे वाढले तरी नाती कमी होऊ देऊ नका. कारण खिशाचे वजन आयुष्याला सुखसोयी देऊ शकते, पण नात्यांचे वजनच आयुष्याला खरं समाधान देतं.
शब्दांकन सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment