मनाच्या नात्यांचे सामर्थ्य ! सुनिल
मनाच्या नात्यांचे सामर्थ्य ! सुनिल पुणेTM8007939422
आपल्या आयुष्यात अनेक लोक भेटतात काही फक्त कौतुक करतात, तर काही खरंच आपल्यासाठी उभे राहतात. कौतुकाचे शब्द गोड असतात, पण ते फक्त कानाला सुखावतात. मात्र, खरी ताकद त्या एका व्यक्तीत असते जी आपल्याला प्रोत्साहन देते, आपल्या चुका दाखवते, पुन्हा उभं राहायला शिकवते आणि आयुष्यातील नकारात्मकतेवर मात करण्याची हिंमत देते.
माणसाला खऱ्या अर्थाने मोठं बनवणारं हे प्रोत्साहन असतं. हजारो लोक तुमच्या यशाचा टाळ्या वाजवून गौरव करतील, पण संकटाच्या वेळी पाठीशी राहून “तू करू शकतोस” असं सांगणारी व्यक्तीच खरं नातं जपते.
नाती रक्ताच्या नात्यांनीच घट्ट होत नाहीत. कधी कधी हक्काची नाती आपल्याला रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त आधार देतात. मैत्री, गुरू-शिष्य नातं, आयुष्यभर सोबत राहणारा जीवनसाथी, वा आई-वडिलांसारखं ममत्व देणारी एखादी व्यक्ती ही सगळी नाती रक्ताची नसली तरी हक्काने आपली असतात.
सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्या हक्काच्या माणसाकडे आपले मन नकळत मोकळे होते. त्याच्याकडे आपण काही लपवू शकत नाही, आणि त्याचा सहवास हवा हवासा वाटतो. एक क्षण त्याच्यासोबत गप्पा मारल्या तरी मन हलकं होतं, आयुष्याला नवी ऊर्जा मिळते.
अशी नाती आयुष्याला खरी ओळख देतात. कारण रक्ताच्या नात्यांची जाणीव हृदयाला उब देते, तर हक्काच्या नात्यांची जाणीव जीवनाला बळ देते.
आज प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या मनात कुठेतरी ही सुप्त आस्था दडलेली असते, मला अशी एक व्यक्ती हवी जी फक्त माझं कौतुक नाही करणार, तर मला उभं राहायला शिकवेल, चुकलो तरी धरून ठेवेल, माझं मन मोकळं ऐकेल, आणि माझ्या नशिबाविरुद्ध लढायला प्रोत्साहन देईल.
खरं तर, आयुष्य जगण्याचं सौंदर्य हीच नाती शिकवतात, कौतुक करणारे शेकडो मिळतील, पण प्रोत्साहन देणारी एकच पुरेशी असते, रक्ताची नाती जन्म देतात, पण हक्काची नाती जीवन घडवतात आणि त्या हक्काच्या नात्यांत मोकळं होणं हीच खरी मन:शांती असते. म्हणुच जीवनात अशी नाती जोडा, जिथे आपली किंमत टाळ्यांत नाही, तर माणुसकीत मोजली जाते.
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment