आजच्या बदलत्या काळातील कुटुंब आणि नात्यांचा प्रवास.
आजच्या बदलत्या काळातील कुटुंब आणि नात्यांचा प्रवास...सुनिल पुणेTM 8007939422..
आजचा समाज वेगाने बदलतोय. शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय या सगळ्या धावपळीत लग्नाचे वय वाढते आहे. ३० वर्षांनंतरही अनेक जण लग्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यातच "छोटे कुटुंब, सुखी कुटुंब" ही संकल्पना इतकी रुळली की, आता एकच मूल घेणे किंवा थेट एकल पालकत्व स्वीकारणे ही पद्धत समाजात झपाट्याने वाढते आहे. पण याचे दूरगामी परिणाम आहेत ते आपण विचारातच घेत नाही.
पूर्वीच्या काळात पाच भाऊ, सहा बहिणी असा मोठा परिवार ही सामान्य गोष्ट होती. एकत्र कुटुंब पद्धतीत आपोआप असंख्य नाती तयार व्हायची. लग्ने झाल्यावर मुलं-बाळं झाली की नात्यांची शिदोरी अजून वाढायची. काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, चुलत भाऊ-बहिणी ही नाती आपल्याला मिळायची आणि त्यात मायेचा जिव्हाळा असायचा.
आज मात्र चित्र पूर्णपणे उलटं झालं आहे. जेव्हा आपण एकल पालकत्व स्वीकारतो, तेव्हा काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, चुलत भाऊ-बहिण ही नाती जन्मालाच येणार नाहीत. एकच मूल म्हणजे पुढच्या पिढीला कोणतेही सख्खा, चुलतबंधू-भगिनी, काका, मावशी नसणे. परिणामी मुलांच्या आयुष्यात आपुलकीची ही सगळी खरीखुरी नाती कायमची हरवून जातात.
डिजिटल युगात नात्यांचा हा तुटलेला धागा केवळ मोबाईलच्या स्क्रीनवरचे ऑनलाईन मित्र जोडतात. पण खरी आत्मियता, कौटुंबिक आधार, संकटाच्या वेळी उभा राहणारा आपला माणूस यामुळे हळूहळू नाहीसा होतोय, हेच उमजत नाहीय.
याचा समाजावर फार मोठा परिणाम होणार आहे. एकाकीपणा, वृद्धत्वातील आधाराचा अभाव, मुलांमध्ये भावनिक संवेदनांचा अभाव, आणि आपलेपण हरवलेलं समाजजीवन, हे सारे परिणाम आपण पुढच्या पिढीत पाहणार आहोत.
नाती ही कधीच रेंटवर मागवता येत नाहीत. काका, मामा, आत्या, मावशी, चुलत भाऊ-बहिण ही खरी संपत्ती आहे. एकल पालकत्व स्वीकारताना आपण ही संपूर्ण संपत्तीच गमावत आहोत, हा साधा पण गहन सामाजिक विचार आपल्याला समजला पाहिजे.
म्हणून आजच्या पिढीने वेळेत सजग होऊन निर्णय घ्यायला हवेत. करिअर महत्त्वाचं आहे, पण कुटुंब आणि नात्यांची उब आयुष्याला खरी श्रीमंती देते. समाज टिकवायचा असेल, तर नाती टिकवावी लागतील.
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment