प्रेमसंबंध नष्ट करणाऱ्या सवयी आणि प्रेमभंगाची कारणे एक विचारमंथन,
प्रेमसंबंध नष्ट करणाऱ्या सवयी आणि प्रेमभंगाची कारणे एक विचारमंथन,
लेखन: सुनिल पुणे TM 8007939422
प्रेम… हा शब्द ऐकला की मनात एक मधुर भावना जागृत होते. दोन व्यक्तींच्या हृदयाचा, विचारांचा, आणि आत्म्याचा एक गोड मिलाफ म्हणजेच प्रेम. पण हे प्रेम टिकवणं जितकं सुंदर, तितकंच कठीणही. अनेकदा आपण प्रेमात असतो, पण नकळत काही वागणुकीमुळे, सवयींमुळे ते नातं हळूहळू विघटित होतं. जेव्हा नातं संपतं, तेव्हा फक्त एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण आयुष्यच बदलून जातं.
चला, अशा सवयींवर आणि प्रेमभंगाच्या मुख्य कारणांवर एक दृष्टिक्षेप टाकूया:
अविश्वासाची सुरुवात
प्रेमाचा पाया म्हणजे विश्वास. पण सतत शंका घेणे, मोबाईल तपासणे, कुठे गेलास? कोणासोबत होतास? असे प्रश्न विचारणे नात्यात फट पाडतात. जिथे विश्वास नाही, तिथे प्रेम टिकत नाही.
भावनांची अनास्था
समोरच्या व्यक्तीच्या भावना, गरजा, मनोवस्था न समजून घेणे हे प्रेमासाठी घातक ठरते. "मला काय त्याचं!" असा विचार हळूहळू दुरावा निर्माण करतो.
सतत टीका करणे किंवा कमी लेखणे
प्रेमात आदर हवा. सतत दुसऱ्याच्या चुका काढणे, त्याचं अपमानास्पद बोलणं, हिणवणं हे आत्मविश्वासच मोडतो आणि एकमेकांपासून ते लांब नेतं.
सोशल मिडियावरून सुरू होणारे भांडणं
सध्या तर तुला का रिमुव्ह केले, ती, तो तुझी, तुझा कोण आहे "तो फोटो तिला का पाठवला?", "स्टेटसमध्ये मला टॅग का नाही केलं?" माझ्या बर्थ डे वर पण लेख लिही वगैरे यावरूनही मोठे वाद होतात. डिजिटल संवादाचा गैरवापरच नात्यातले अंतर वाढवतोय.
संवादाचा अभाव
कुठलाही संबंध संवादाशिवाय टिकत नाही. पण बऱ्याचदा "त्याला समजेलच", "ती ओळखेलच" असं गृहित धरलं जातं आणि संवाद तुटतो. तेव्हा गैरसमजांचे बुडबुडे फुटायला वेळ लागत नाही.
बनावटपणा आणि 'स्वतःला दाखवणं'
प्रेमात स्पष्टता हवी व खरेपणा हवा. पण जेव्हा आपण वेगळे भासतो, नकली भूमिका करतो, तेव्हा ती व्यक्ती समजते की हे सगळं फसवणूक आहे. आणि मग प्रेम संपतं.
वेळ न देणं / दुर्लक्ष करणं
'व्यस्त आहे', 'मला वेळ नाही', अशा कारणांनी आपण एकमेकांना वेळ देत नाही. पण प्रेमाला वेळ आणि उपस्थिती दोन्ही कडून लागते. अन्यथा ते नातं एकतर्फी होतं.
इगो आणि अहंकार
"मी माफी का मागू?", "मीच का झुकावं?" हा अहंकार हळूहळू प्रेमाचा घास घेतो. प्रेमात झुकावं लागतं ती हार नसते, ती असते आपुलकीची जाणीव.
जुन्या आठवणी किंवा एक्सचा संदर्भ
"माझा एक्स असा नव्हता", "तिच्याशी बोलताना जास्त मजा यायची" अशा वाक्यांनी नातं पूर्णपणे कोलमडू शकतं. जे गेलं ते गेलं सध्याच्या प्रेमाचा अपमान करू नका.
प्रेमभंग शेवट नव्हे, एक नवा अध्याय
प्रेमभंग झाल्यावर आयुष्य संपत नाही, पण हो, वेदना होतात, अश्रू येतात, मन खचतं. पण हेच क्षण आपल्याला शिकवतात. कोण चुकलं यावर रडण्यापेक्षा, आपण पुढच्या नात्यात काय चुकवायचं नाही, हे शिकणं महत्त्वाचे असते.
प्रेम जपायचं असेल, तर...
संवाद करा, ऐका.
विश्वास ठेवा, अजून वाढवा.
मोबाईलपेक्षा डोळ्यात डोळे घालून बघा.
प्रत्येक वेळी परिपूर्ण व्यक्ती शोधू नका, त्याला परिपूर्ण समजून घ्या...प्रेमात 'मी'पेक्षा 'आपण' हा शब्द जास्त सुंदर असतो...नातं हे पोषण करावं लागतं. जसं एखादं झाड वाढण्यासाठी पाणी, माती, ऊन, सावली लागते, तसंच प्रेमासाठी विश्वास, संवाद, आदर आणि काळजी लागते.
प्रेम नष्ट करणाऱ्या सवयी ओळखा आणि त्या सुधारून प्रेमाचं नातं टिकवा…
कारण प्रेम ही फक्त भावना नसून, तीच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे.
लेखक: सुनिल पुणे TM
आयुष्याकडे बघण्याची एक वेगळीच नजर. 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment