सुनिलच्या लेखणीतील श्रीकृष्ण...

सुनिलच्या लेखणीतील श्रीकृष्ण...
✍🏻 सुनिल पुणे TM 8007939422

कृष्ण म्हणजे एक गूढ, एक अनाकलनीय सत्य, एक शाश्वत आधार...
तो राधेच्या हृदयात होता आणि अर्जुनाच्या श्वासातही. राधेसोबत प्रेमाच्या हळुवार बंधनात रमणारा तो, अर्जुनासोबत धर्मयुद्धाच्या रणांगणात स्थिर उभा राहणारा होता...कृष्णाला ठाऊक होतं की राधा त्याची कधीच होणार नाही, आणि अर्जुनाचे यश त्याच्या झोळीत काही आणून देणार नाही. तरीसुद्धा नाती निभावताना त्याने स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही. हेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विलक्षण वैशिष्ट्य होतं.

गोकुळ सोडल्यानंतर राधेकडे परत वळून तो कधीच पाहत नाही. राज्याभिषेकानंतर अर्जुनाच्या जीवनात तो पुनःप्रवेश करत नाही. उत्कट नात्यांना तो पूर्णत्व देतो आणि मग अलगद मागे सरकतो, ना खंत, ना खेद, फक्त समर्पण! ..राधेसाठी त्याची बासरी गात होती, प्रेम, अनुराग आणि माधुर्याचे सूर. आणि त्याच वेळी अर्जुनासाठी त्याची वाणी गीता झाली. कर्तव्य, धर्म आणि रणनितीचा मार्गदर्शन करणारी.
बोटे जशी बासरीवर नाचत होती, तशीच ती सुदर्शन चक्रही फिरवत होती. प्रेम आणि रण, माधुर्य आणि कुटनीती, दोन्ही त्याने तितक्याच निपुणतेने जोपासले.

कृष्णाचा गाभा हा निरपेक्षता होता. कुणासाठी तो आपला, कुणासाठी तो परका, अशी विभागणी त्याच्या जीवनात नव्हती. राधेच्या डोळ्यांत तो प्रेमाचा शाश्वत स्वर होता, तर अर्जुनाच्या डोळ्यांत विजयाचा दीपस्तंभ...कृष्ण म्हणजे केवळ देव नव्हे, तो जीवनाचा मार्ग आहे. प्रेमळ मित्र, आधार देणारा जिवलग, बुद्धिमान राजकारणी, रणांगणातील कुटनीतिज्ञ आणि प्रत्येकाला योग्य दिशा देणारा सतत स्थिर राहणारा पुरुषोत्तम!...म्हणूनच...
जीवनात कितीही संकटं आली, कितीही नाती डळमळली, कितीही संघर्षांचा अंधार दाटला तरी एकच गोष्ट हव्यात
"कृष्ण पाठीशी हवा!"

सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?