"परिस्थिती आणि माणसं, आपलेपणाची खरी परीक्षा!"

"परिस्थिती आणि माणसं,  आपलेपणाची खरी परीक्षा!"
लेखक  सुनिल पुणे TM

"हे पटणार नाही, पण सत्य हेच की लोक आपली परिस्थिती पाहूनच आपल्याशी संबंध जोडतात..."
हे वाक्य जितकं कटू आहे, तितकंच ते सत्यही आहे. पण हे सत्य फक्त अर्धंवट आहे. कारण यात माणसांची स्वार्थी बाजू दिसते, पण दुसरी बाजूही आहे  ती समजून घ्यायला हवी.

आपण सगळेच हे अनुभवलेलं असतं. जेव्हा आपण यशाच्या शिखरावर असतो, तेव्हा सगळे "आपले" वाटतात. फोन वाजतात, कौतुक होतं, खांद्यावर थाप दिली जाते, आणि प्रत्येकाला आपल्या यशात थोडीशी जागा हवी असते. आपण एखादा मोठा करार जिंकतो, छान फोटोशूट करतो, नाव येतं तेव्हा "आपण आहे म्हणून" लोक येतात.
पण…

एकदा का परिस्थिती उलटी झाली, व्यवसाय थोडा डगमगला, आर्थिक चक्र थांबलं, थोडं मागे पडलो, की हीच मंडळी अनोळखी होतात. ज्यांनी आपल्याला "भाऊ", "मैत्र" किंवा "सर" म्हणून हाक मारली होती, ते हळूहळू मूक होतात. काहीजण तर आपल्याला टाळतातही.
का? कारण त्यांना आपली परिस्थिती नकोशी वाटते. त्यांच्या नजरेत ‘status’ महत्वाचा असतो, माणूस नाही.

पण सगळेच असे नसतात...

ही एक बाजू आहे. पण दुसरी बाजूही तितकीच खरी आहे. कारण अशा प्रतिकूल परिस्थितीत, काही चेहरे असेही असतात जे आपल्याजवळ उभे राहतात. जे आपल्या यशासाठी नव्हे तर आपल्या अस्तित्वासाठी आपल्या सोबत असतात. जेव्हा यशाच्या आतषबाज्या थांबतात, तेव्हा खरे मित्र, कुटुंबीय, जोडीदार किंवा एखादा सहकारी आपल्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो. हेच असते "नात्याचं खरं मूल्य".
या कठीण काळातच आपल्याला समजतं की "लोक आपल्याशी का जोडले होते" का ?  परिस्थितीसाठी, की माणूस म्हणून? स्वतःला परिस्थितीवर मोजू नका, परिस्थिती बदलते, पण तुमची किंमत यशावर नाही तर तुमच्या विचारांवर असते.

संबंध टिकवा, पण अपेक्षा नको, जो सोबत राहतो तोच आपला, हे मनाशी पक्कं करा. बाकी "हवेप्रमाणे वळणारे" असतात. तुम्ही कोण आहात, हे यश-अपयशावर नाही, तर संघर्षात ठरतं.
जे संकटात तुम्हाला साथ देतात, त्यांच्यासाठी कायम ऋणी राहा. कारण ते माणूस ओळखतात, परिस्थिती नाही.

परिस्थिती हळूहळू सुधारते, पण माणसं मात्र परिस्थितीप्रमाणे बदलतात. हे वास्तव आहे. परंतु, यामुळे खचून जाऊ नका. यश तुमचं आहे, अपयशही तुमचं आहे, पण त्यामागचं प्रयत्नांचं सामर्थ्यही फक्त तुमचंच आहे.

काही लोक आपलं नातं तोडतील, काही विसरतील, काही आपल्याला चुकीचं समजतील पण शेवटी तुमचं सत्यच तुमचं भविष्य घडवेल.

कदाचित आज तुम्ही एकटे असाल, पण उद्या तुम्ही पुन्हा यशस्वी व्हाल, आणि यावेळी नात्यांची खरी ओळख तुम्हाला असेल.

सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
(ज्यांनी आयुष्याच्या अनेक चढ-उतारातून हे स्वतः अनुभवलं आहे.)

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"