"आपुलकीच्या नात्यांना दुसऱ्याच्या शब्दांनी नात्यातील विश्वास फाटू देऊ नकोस..."
"आपुलकीच्या नात्यांना दुसऱ्याच्या शब्दांनी नात्यातील विश्वास फाटू देऊ नकोस..." सुनिल पुणे TM 8007939422
प्रिय
माणसाला नात्यांमध्ये गुंतवणं हे नैसर्गिक आहे, पण ते नातं जपणं मात्र एक कला आहे. आणि दुर्दैवाने आजच्या काळात ही कला हरवत चालली आहे... विशेषतः जेव्हा आपण आपलं मन दुसऱ्याच्या म्हणण्यावर ठेऊन, आपल्या अगदी जवळच्या माणसांपासून दुरावतो.
माझं एकच सांगणं आहे
दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका...कारण हे जग कधीच निष्पाप नव्हतं.
जगाची जुनी सवयच आहे की
काडी टाकून आग लावायची, आणि मग स्वतः शांतपणे त्या आगीत उब घेत बसायचं!
कोण किती जवळचं आहे, हे तुम्हाला समजत असताना कुणाच्या तरी बोलण्याने त्या नात्यावर शंका घेणं, ही आपल्या माणसांवर अन्यायच ठरतो. आपण आपलेपणाने नातं जोपासतो, त्यात ओल ठेवतो, भावना गुंतवतो… आणि कुणीतरी एकतर्फी सांगितलेलं काहीतरी ऐकून आपणच फूट घालतो?
हा न्याय आहे का?
आज तुम्ही जर एखाद्या आपुलकीच्या माणसापासून फक्त राग, गैरसमज किंवा कुणाच्या बोलण्यामुळे दूर झालात… तर कदाचित उद्या तुम्हालाच समजेल की ज्याचं नुकसान झालंय ते तुमचंच आहे.
कारण...
नात्यात जर एकदा फूट पडली, तर ती भरून काढायला वेळ लागतो... आणि काही वेळा तर संपूर्ण आयुष्यदेखील पुरत नाही.
नात्यांचं जपणं म्हणजे रोज एक लहानशी मशागत असते. रोज एक संवाद, रोज थोडं समजून घेणं, रोज थोडं हसणं, थोडं रडणं, थोडं समंजसपणाने वागणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, एकमेकांवर विश्वास ठेवणं!
बाहेरचं कोण काय म्हणालं, हे महत्त्वाचं नाही...महत्त्वाचं ते आहे, जे तुम्ही तुमच्या मनाने, अनुभवाने आणि प्रेमाने समजून घेतलेलं असतं.
जगाच्या कानावर अजूनही एखाद्याच्या नावाने वारे येतात,
पण प्रेमाच्या झाडाची मुळं नेहमी आत खोलवर असतात...म्हणूनच, एखाद्या वाऱ्याच्या झुळुकीने जर आपण आपलं झाडच उखडून टाकलं…
तर त्यात दोष वाऱ्याचा नाही, आपल्या संयमाचा असतो....आज तुमच्याजवळ जी माणसं आहेत, ती तुमच्या प्रेमाने, तुमच्या विश्वासाने आणि तुमच्या शब्दांनी जोडलेली आहेत..ती तोडणं सहज शक्य आहे… पण पुन्हा ती उभी करणं, ते नातं पुन्हा जपणं हे खूप कठीण आहे.
प्रेम ही फुलासारखी भावना आहे...तिच्यावर जरा गैरसमजाचं पाणी सांडलं, की ती सुकते...पण जर त्यावर वेळेचं, समजुतीचं आणि विश्वासाचं खत घातलं, तर ती पुन्हा खुलते आणि अधिक सुंदरपणे उमलते.
शेवटी एकच सांगतो,
कधीच तुमच्या आपुलकीच्या माणसांना दुसऱ्याच्या मतावरून मोकळं करू नका.
कारण जगात हजारो लोक भेटतील, बोलतील...पण तुमच्या मनात घर केलेली माणसं फार थोडी असतात. त्यांना गमावून बसलात,
तर पुढे आयुष्यभर वाट पाहावं लागेल, त्या एका 'शांततेच्या' संवादासाठी...
तुमचं नातं अबाधित राहो, अधिक खुलो...
हीच शुभेच्छा.
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
आपुलकीने नाती जपणारा…लेखक blogger
Comments
Post a Comment