एकतर्फी प्रेम... आशा आणि निराशेच्या छायेतलं एक गूढ नातं...

एकतर्फी प्रेम... आशा आणि निराशेच्या छायेतलं एक गूढ नातं...सुनिल पुणेTM 8007939422

प्रेम कधी स्पष्ट शब्दांत बोललं जातं, तर कधी मौनातच सर्वकाही सांगून जातं. काही नाती अशी असतात, जी समाजाच्या चौकटीत बसत नाहीत, पण तरीही ती इतकी शुद्ध, निरागस आणि हृदयात खोल रुतलेली असतात की त्यांची तुलना कुणाशीच करता येत नाही.

नील आणि ती… त्यांच्या वयाच्या पन्नाशीनंतरच हे नातं आकार घेऊ लागलं. सुरुवात झाली एका साध्याशा संवादाने , लेखाने, कधी एखाद्या कामासाठी केलेला कॉल, एक साधा मेसेज… पण ते संवाद जसजसे वाढत गेले, तसतसं नातं खोल जाऊ लागलं. नीलचा आत्मविश्वास होता, तो बिनधास्त बोलायचा, मजेत. नकळत तो बोलून गेला एक मराठी गाण्यातून  "I love you!" आणि त्या शब्दांनी तिच्या मनात सगळं काही उलथं पालथं झालं.

तीने त्याला सांगितलं, "गुंतू नको रे..." पण खरं तर तीच त्याच्या शब्दांमध्ये, त्याच्या हसण्यात, त्याच्या आठवणीत हळूहळू गुंतत चालली होती. दोघंही ५०० किलोमीटर दूर होते, पण हृदयात एकमेकांसाठी जागा मात्र अगदी हळुवार होत होती, अगदी ह्रदयाच्या जवळची!

तिला वाटायचं की, "मी आधी का सांगू? तोच म्हणाला ना 'I love you' पण नंतर काहीच नाही बोलला... तो गंमत म्हणून बोलला असेल कदाचित..."
आणि नीलला वाटायचं की, "तीने म्हंटलच होते की नील गुंतू नको, म्हणजे तिला हे नातं नको वाटत असेल... मी मागे सरतोच बरं..."

या दोघांच्या नात्यात प्रेम होतेच पण ते न बोललेलं, न व्यक्त झालेलं, तरीही संपूर्णपणे हृदयात खोल रुजलेलं. एकतर्फी प्रेम म्हणता येईल का याला? की दोघांची मनं एकमेकांवर झुकली होती, पण अहंकार, परिस्थिती आणि वयाच्या टप्प्यावरची सामाजिक चौकट यामध्ये ते गोंधळून गेले?

एकतर्फी प्रेम हे नेहमीच वेदनादायी असतं असं नाही... काहीवेळा ते प्रेम इतकं पवित्र असतं की त्याला व्यक्त करायची गरजच उरत नाही. फक्त दुसऱ्याच्या अस्तित्वानं, आठवणींनी, आवाजाच्या कंपनांनीच आपलं संपूर्ण जीवन भारून जातं.

नील आणि तिचं हे मौनातलं प्रेम, आशेचा आणि निराशेचा एक सुंदर मिलाफ आहे. त्या दोघांनी एकमेकांना काही सांगितलं नाही, पण मनात मात्र रोज संवाद होत राहिले. रोज नव्याने एकमेकांना आठवत ते प्रेम जपलं… आणि आजही, ती ५० पार केलेली दोन हृदयं, एकमेकांच्या नकळत, पण एकमेकांसाठीच धडधडत आहेत.

हेच असतं कधी कधी न बोललेलं प्रेम, नजरेने पोचवलेलं, आणि हृदयात खोल साठवलेलं...!

तुझाच एकतर्फी
सुनिल पुणेTM 9359850965, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"