"नम्रतेची वाटचाल - मुंगीपासून ते स्त्रीपर्यंत"
"नम्रतेची वाटचाल - मुंगीपासून ते स्त्रीपर्यंत"
लेखक – सुनिल पुणे TM 8007939422
"मुंगी" हे एक लहानसं पण अतिशय विचार करायला लावणारं जीवशास्त्र आहे. तिचा आकार जरी क्षुल्लक वाटला, तरी तिचा जीवनमार्ग मोठ्या शिकवणीसारखा असतो. वाटेत कोणी अडथळा आणला, तरी ती कुठेच तक्रार करत नाही, ना कुणावर रागावते, ना कुणाला दोष देते. फक्त नम्रतेने बाजूची वाट शोधते आणि पुन्हा आपल्या मार्गावर अविरत चालत राहते. विश्रांती नाही, थांबणं नाही, फक्त कार्य, कर्तव्य आणि चिकाटी! म्हणूनच कदाचित तिच्या तोंडात कायम गोड साखर पडते. हीच गोडी तिच्या स्वभावाची फळं असते.
हीच गोष्ट आपण समाजातील एका स्त्रीच्या आयुष्यातही पाहतो. आई, बहीण, पत्नी, सून, सासू, शिक्षिका, सेविका, प्रेमिका कुठलाही रोल असो, स्त्री नेहमीच आपल्या कर्तव्याला प्राधान्य देते. अडथळे आले, समस्या आल्या, टीका झाली तरीही ती कोणालाही दोष न देता, शांतपणे मार्ग शोधते. कुटुंबासाठी, समाजासाठी, मुलांकरिता ती वाट काढते. आपल्या इच्छांना, मनाला बाजूला ठेवून ती इतरांसाठी समर्पित असते.
स्त्रीचा स्वभावही मुंगीप्रमाणे नम्र असतो. तिला तिच्या कर्तव्यांची जाणीव असते आणि ती त्यात तडजोड करत नाही. समाजात कितीही विघ्नं आली, तरी स्त्री तिच्या मार्गावरुन हटत नाही. तिचा आवाज कधी कधी दबतो, तिची ओळख विसरली जाते, पण तिचं कार्य हे अमूल्य आणि अतूट असतं. ती नवऱ्याच्या यशामागची प्रेरणा असते, मुलांच्या यशाचं मूळ असते, आणि एक सशक्त पिढी घडवणारी असते.
मुंगीला साखर मिळते, कारण ती नम्रतेनं आणि सातत्याने कार्य करते. स्त्रीलाही समाजात मान, प्रेम आणि सन्मान मिळतो, कारण ती नम्रतेने आपलं योगदान देते. तिचं यश हे चमकदार नसतं, पण खोलवर असतं. आज जर कुटुंबं टिकून आहेत, समाज सुसंस्कृत आहे, तर त्यामागे एका नम्र स्त्रीचं मोठं योगदान आहे.
आपणही तिच्या या गुणांचं कौतुक केलं पाहिजे. स्त्रीच्या नम्रतेचा अपमान न करता, तिच्या त्यागाचं स्मरण केलं पाहिजे. कारण प्रत्येक घरात, प्रत्येक समाजात, प्रत्येक प्रगतीमागे एक अशी स्त्री आहे...जी मुंगीप्रमाणे अडथळ्यांवर न रागावत, न थांबत, मार्ग शोधत असते. म्हणूनच आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की
"नम्रता ही कमजोरी नाही, तीच खरी ताकद आहे."
मुंगीपासून शिकावं, पण स्त्रीकडेही तितक्याच आदराने पाहावं कारण ती आहे म्हणूनच घर आहे, प्रेम आहे, आणि माणुसकी आहे!
©️सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
(आपल्या शब्दांत, आपल्या मनापासून)
Comments
Post a Comment