"क्षणभंगूर आयुष्य आहे आणि आनंदी जीवन हिच खरी संपत्ती"
*"क्षणभंगूर आयुष्य आहे आणि आनंदी जीवन हिच खरी संपत्ती"*
सुनिल पुणे TM 8007939422
आयुष्य म्हणजे पाण्याचा एक बुडबुडा... कधी फुटेल, कधी विरून जाईल, याचा नेम नाही. आपण रोजच्या धावपळीत किती तरी गोष्टींचा विचार करतो, पुढील महिन्याचा EMI, पुढच्या वर्षीचं टूर प्लान, मुलाचं शिक्षण, पेन्शन योजनेची तरतूद... पण आयुष्य पुढच्या क्षणाची हमीच देत नाही.
परवा घडलेली अहमदाबादजवळील एअर इंडिया विमान अपघाताची घटना आपल्या मनाला हादरवणारी होती. 241 प्रवासी... जे काही क्षणांपूर्वी विमानात हसत-खेळत बसले होते, आपापल्या स्वप्नांचं गाठोडं मनात घेऊन उड्डाण करत होते... पण काही क्षणांतच काळाच्या अधीन झाले. त्यांच्या योजना, त्यांच्या इच्छा, त्यांच्या चिंता, त्यांची मैत्री सगळं काही एका क्षणात सर्व संपलं!
आपल्याकडे रोज रस्ते अपघात होतात, मोटारी उलटतात, रेल्वेमधून पडून जीव जातो... आणि काही वेळा वाटतं, आपणही तेव्हाच होतो ना त्याच ठिकाणी... मग आपण का वाचलो? आणि ज्या गेले, त्यांचं काय चुकलं होतं?
हे सगळं पाहता, एकच गोष्ट लक्षात येते, आयुष्य कोणालाही हमीपत्र देत नाही. मग का आपण रोज कुणाला दुखवत जगायचं? का खोट्या प्रतिष्ठेच्या, अहंकाराच्या, स्पर्धेच्या गर्तेत नातं-मैत्री तोडायचं? का कुणाला मदत करण्याची वेळ येईपर्यंत थांबायचं? म्हणूनच..
*प्रत्येक दिवस संधी आहे.*
*प्रत्येक क्षण एक भेट आहे.*
*प्रत्येक माणूस आपल्यासमोर एक दैवत आहे.*
आज आहे, उद्या नाही, हे जेव्हा आपल्याला उमजेल, तेव्हाच आयुष्य आनंदी होईल. आपण कोणाला मदत केली नाही तरी चालेल, पण कोणाला वेदना देऊ नये, हीच खरी मानवतेची शिकवण आहे. हसत रहा, प्रेम करत रहा, नाती जपा, अन् जे काही आज आहे, ते पूर्णपणे जगून घ्या. कारण उद्या... कोणालाच माहित नाही.
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment