एकांताच्या सावल्यांतून उमलणारी ती.
*"एकांताच्या सावल्यांतून उमलणारी ती..."*
(लेखक – सुनिल पुणे TM 8007939422)
*ती… जी आज एकटी राहते असेल किंवा समाजात "विधवा" या नावाने ओळखली जात असेल.*
पण एकेकाळी संसाराच्या रंगमंचावर तिची भूमिका सौभाग्यवती म्हणून तेजस्वी होती. पण नियतीने तिच्या हातात संधी नाही, तर सावली दिली. पती हरपल्यानंतर समाजाने तिला हळूहळू एकटं केलं… आणि मग सुरू झाली तिच्या मनाची एक अदृश्य गाथा…
ती गाथा कुठे लिहून ठेवलेली नसते. पण ती तिच्या नजरेत असते, तिच्या शांततेत असते, तिच्या साडीच्या पदरात दडलेली असते. दिवस भर शेजाऱ्यांसोबत हसणारी, देवळात देवासमोर हात जोडणारी, बाजारात फळं घेताना सौदा करणारी, ही तीच असते. पण रात्रीची शांतता आली की, तिच्या मनातल्या आठवणींचा कल्लोळ सुरु होतो.
ती झोपताना उशीत डोळे नाही, तर अश्रू दडवते.
पण तरीही...
ती मोडत नाही.
ती उभी राहते.
तिच्यात एक वेगळी ताकद असते, जिचं नाव असतं "अनुभव."
समाज तिच्याकडे कधी दयेने बघतो, कधी संशयाने. कुणाला वाटतं, "एकटी स्त्री म्हणजे लगेच तिच्या मागे लागा." कुणी म्हणतं, "आता हिला संसाराची गरज नाही." पण कुणी विचारत नाही, "तीला काय वाटते ? ती काय स्वप्न पाहते? ती सुद्धा माणूस आहे ना!" ?
ती आई असते, सून असते, मावशी, काकू, शेजारीण, प्रेयसी सुध्दा असते. पण तिचं स्वतःचं अस्तित्व समाज विसरतो. ती देखील प्रेम, सन्मान, आदर, संवाद या सगळ्याची हक्कदार आहे.
ह्या लेखातून मी फक्त एकच सांगू इच्छितो,
ती एकटी असली, तरी ती कमकुवत नाही. ती विधवा असली, तरी तिच्या आयुष्यात अजूनही वसंत येऊ शकतो.
समाजाने तिच्याकडे एकटेपणाच्या चष्म्यातून बघणं थांबवायला हवं. तिच्यासोबत संवाद साधायला हवा. तिच्या मनातल्या ओलसर गाठींना समजून घ्यायला हवं. कारण अशा स्त्रिया खूप काही शिकवू शकतात, धैर्य, सहनशक्ती आणि जगण्याची उमेद!
*आज प्रत्येक स्त्रीने, लग्न झालेली असो, न झालेली, घटस्फोटित असो किंवा विधवा, या लेखातून एक गोष्ट मनात रुजवावी: "आपलं अस्तित्व ही आपली जबाबदारी आणि आपला अभिमान आहे."*
आपल्या आजूबाजूला अशा एकट्या राहणाऱ्या महिलांना जरा प्रेमाने, आदराने आणि समानतेने वागवा. तुमच्या एका हसऱ्या संवादातून कदाचित तिचं आयुष्य थोडं सुकून देणारं होईल.
ती एकटी आहे, पण तिच्या मनात एक जग आहे. चला, आपण ते जग समजून घेऊया.
सुनिल पुणे TM, 9359850065, sunilpunetm.blogspot.com
(फोटोग्राफीक परिक्षक महाराष्ट्र पोलिस अकॅडमी, MIT कॉलेज BFA, लेखक आणि समाजनायक)
कृपया या लेखाचं स्वागत करावं आणि तुमच्या मैत्रिणींना, आईला, शेजारच्या एका एकट्या राहणाऱ्या स्त्रीला शेअर करावं, कारण हे शब्द तिच्या मनात थेट पोहोचू शकतात… आणि जगायला एक नवा उमेद देऊ शकतात.
🫵🏻🙏🏻
Comments
Post a Comment