"वेळेचा सन्मान जीवनाचा खरा यशोमार्ग"*लेखक:
#everyone @everyone
*"वेळेचा सन्मान जीवनाचा खरा यशोमार्ग"*
लेखक: सुनिल पुणे TM 8007939422
मानव जीवन हे काळाच्या प्रवाहात वाहणारा एक अनोखा प्रवास आहे. या प्रवासात यश, अपयश, माणसं, नाती, समाज, संधी आणि संघर्ष यांचा सतत लपंडाव सुरू असतो. पण या सगळ्यांना एकत्र गुंफणारा आणि नियंत्रित करणारा अदृश्य सूत्रधार म्हणजे वेळ.
वेळ चांगली असेल, तर परका माणूसही आपल्यासाठी धावून येतो. लोक तुमचं बोलणं ऐकतात, तुमचं कौतुक करतात, तुम्हाला मान-सन्मान देतात. पण वेळ खराब झाली की, अगदी स्वतःची पत्नी, पती, मुलं, आई-वडील, भाऊ-बहीण आणि सख्खे नातेवाईकसुद्धा आपल्याला नाकारतात, परके समजू लागतात. त्यांच्या वागणुकीतले बदल जणू वेळेचंच प्रतिबिंब असतं.
ही कटू पण सत्य गोष्ट आहे वेळ चांगली असेल, तर सगळे आपले होतात, आणि वेळ वाईट आली की अगदी आपलेही परके होतात. ही वास्तवता कोणतंही शिक्षण शिकवत नाही, पण जीवन नजरेतून शिकवते.
वेळ ही अशी गोष्ट आहे जी कोणासाठी थांबत नाही. ती प्रत्येकाला सारखीच मिळते २४ तासांची. फरक एवढाच की कोणीतरी तिचा योग्य उपयोग करतो, तर कोणी ती वाया घालवतो. वेळेला समजून घेणं म्हणजे स्वतःच्या यशाचं दार उघडणं होय.
कित्येक यशस्वी व्यक्तींच्या मागे एकच गुपित असतं त्यांनी वेळेचा सन्मान केला. त्यांनी वेळेचा अपमान केला नाही, वेळ फुकट घालवली नाही. आणि म्हणूनच आज ते समाजात मान मिळवतात. त्यांना कोणी नाकारत नाही, कारण त्यांच्या यशामागे वेळेच्या व्यवस्थापनाची शिस्त आहे.
वेळ निसटली की ती पुन्हा मिळत नाही, आणि वेळ हातात असताना तिचं मोल ओळखणं हेच शहाणपण आहे.
म्हणूनच, आजच्या तरुणांनी, उद्योजकांनी, कलाकारांनी आणि सर्वसामान्य माणसांनी हे समजून घेतलं पाहिजे की वेळेची परीक्षा कधी कुणाला कुठे घेईल सांगता येत नाही. पण वेळेचा आदर करणाऱ्याला ती नक्की यश देते.
आपल्या चांगल्या वेळेसोबत आनंद घ्या, पण वाईट वेळेसोबत आत्मपरीक्षण करा. कारण हीच वेळ तुम्हाला अधिक प्रगल्भ बनवते.
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
(प्रेरणादायक लेखन व छायाचित्रकार समुदायासाठी, समाजकार्य साठी सक्रिय, मॅनेजर, परिक्षक, राज्यस्तरीय महामित्र, अध्यक्ष, सचिव, संस्थापक)
Comments
Post a Comment