अडचणीत तिला साथ दिली, म्हणून ती साथ आयुष्यभराची झाली

*"अडचणीत तिला साथ दिली, म्हणून ती साथ आयुष्यभराची झाली"*
(लेखक: सुनिल पुणे TM 8007939422)

आपल्या आयुष्यात अनेक नाती येतात, काही थोडा वेळ सोबत राहतात, काही कायमस्वरूपी आपल्यात मिसळून जातात. पण एक नातं असं असतं, जे एकदा जोडलं की त्यात विश्वास, माया, त्याग, समर्पण, आणि न बोलता समजून घेण्याची ताकद असते,  ते म्हणजे "स्त्री"चं नातं.

एखादी स्त्री जेव्हा तुमच्या आयुष्यात येते, ती फक्त सौंदर्य घेऊन येत नाही, तर मनामधील मायेचा झरा घेऊन येते. ती तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते, तुमच्या आवडीनिवडी सांभाळते, आणि तुम्ही कधीच बोलून दाखवलं नाही तरी तुमच्या मनातली दुखणी ओळखते.

पण खरं प्रेम, खरं आपुलकी, आणि खरं नातं तेव्हाच सिद्ध होतं… जेव्हा अडचणींचा डोंगर तुमच्यासमोर उभा राहतो.

घरात आर्थिक संकटं असो, मानसिक ताण असो, समाजाकडून मिळणारा विरोध असो, किंवा अपयशाच्या वेदना असोत,  त्या सगळ्या क्षणांत जर ती स्त्री तुम्हाला सोडून गेली नाही, तर तिचं प्रेम नशिबाचं नव्हे तर आयुष्याचं वरदान आहे.

अशी एखादी स्त्री, जी तुमच्या अडचणीत उभी राहते, कधी तुमच्यासाठी समोर ताटात अन्न घालते आणि स्वतः उपाशी राहते, कधी तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवते, आणि कधी तुमचं रडणं मनात साठवून स्वतः हसत राहते,  ती स्त्री फक्त बायको नाही, ती तुमचं जग बनून राहते.

ती तुमच्या यशाची वाट पाहते, तुमच्या दुखांत ढाल बनते, आणि एकटेपणात सावलीसारखी साथ देते. ती नुसती "साथी" नसते, ती तुमचं मनोधैर्य, प्रेरणा आणि विश्वास बनते.

आज समाजात अनेक पुरुष मोठे होतात, यशस्वी होतात. पण त्या यशाच्या मुळाशी जर खोल जाऊन पाहिलं, तर एक स्त्रीचं निःशब्द त्याग आपल्याला दिसतो, कधी आईच्या रूपात, कधी बायकोच्या, कधी बहिणीच्या तर कधी प्रेमाच्या रूपात.

म्हणूनच एकच वाक्य सांगावंसं वाटतं…
"कोणतीही स्त्री जर तुमच्या अडचणीत तुमच्यासोबत उभी राहिली, तर तिचं मन जपा… ती स्त्री मग आयुष्यभर तुमचं मन जपेल."

तीच साथ असते, जी संकटात ओढून न नेता हात धरून बाहेर काढते.
तीच प्रेम असतं, जे नशिबावर नाही तर विश्वासावर उभं असतं.
आणि तीच स्त्री असते, जिला विसरायचं कारण नसतं, फक्त जपायचं कारण असतं…

सुनिल पुणे TM
तुमच्या भावना, माझ्या शब्दांत

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?