"स्त्री – एक शक्तिरूप, एक सन्मान"
*"स्त्री – एक शक्तिरूप, एक सन्मान"*
लेखक : सुनील पुणे TM 8007939422.
स्त्री म्हणजे केवळ एक जीव नाही, ती संपूर्ण सृष्टीचा आत्मा आहे. समाजाने कितीही पुरुषप्रधानतेचा बुरखा पांघरला असला, तरी स्त्रीची खरी ओळख ही तिच्या सामर्थ्यानेच होते. ती केवळ ताई, पत्नी, आई, सासू, आजी या नात्यांपुरती मर्यादित नाही; ती एक विचार आहे, एक संस्कृती आहे, आणि एक प्रेरणास्रोत आहे.
जन्मल्याक्षणापासून ती जबाबदाऱ्या स्वीकारते. घराला घरपण ती देते, आणि माणसाला माणूसपण ती शिकवते. तिच्या मिठीतच जीवनाचं खरे सुख लपलेलं असतं. पुरुष हा केवळ शरीराने बळकट असतो, पण स्त्री ही मनाने, भावनांनी, सहनशीलतेने, आणि विचारांनी कितीतरी पटीने बलवान असते.
*इतिहास साक्षी आहे — राणी लक्ष्मीबाईने तलवार हातात घेत स्वराज्यासाठी शत्रूंशी सामना केला. दुसरीकडे, समाजाच्या अन्यायाविरुद्ध फुलनदेवींनी बंड पुकारले. एका बाजूला सावित्रीबाई फुले सारख्या स्त्रीने शिक्षणाचा दीप लावला, तर दुसरीकडे कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांसारख्या स्त्रिया अंतराळातही झेपावल्या. हे काही उदाहरणं पुरेसे आहेत स्त्रीच्या सामर्थ्याची गाथा सांगायला.*
ती रडते, पण अश्रूंमध्येही ताकद असते. ती हसते, पण त्या हसण्यामागे हजारो वेदना झाकलेल्या असतात. ती गप्प राहते, पण तिचं मौन हे समाजाच्या ढोंगीपणावर बोट ठेवत असतं.
आजच्या काळातही, ती वडिलांच्या घराची शान असते आणि सासरच्या घराची आधारवड. ती नवऱ्याची सावली, आणि मुलांची पहिली गुरु असते. ती हातात चूल सांभाळते, आणि दुसऱ्या हातात वेळ आली तर तलवारही. घर चालवताना तिच्या मनात कितीतरी स्वप्नं असतात — स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी.
स्त्री म्हणजे शक्ती, ममता, करुणा, विचार, आणि उत्कर्ष. समाजाने आता फक्त तिचं सन्मान करायचं शिल्लक आहे.
हे वाचून कोणतीही स्त्री म्हणेल – *"हो, मी अभिमानाने जगणारी एक स्त्री आहे!"*
आणि मला खात्री आहे की, अशी लेखणी वाचून त्या माझ्या लेखावरही प्रेम करतील – कारण हा लेख त्यांच्याच मनातल्या भावना बोलतो आहे.
सुनील पुणे TM 9359850065.
topsunil@gmail.com
08/05/2025.
Comments
Post a Comment