"थांबायचं तिथेच... जिथे मनाला आनंद मिळतो"

*"थांबायचं तिथेच... जिथे मनाला आनंद मिळतो" सुनिल पुणे TM 8007939422*

आपल्या आयुष्यात अनेक वळणं, अनेक वाटा येतात. काही ठिकाणी आपण क्षणभर थांबतो, काही व्यक्ती आपल्याला थोडा वेळ थांबवतात… पण शेवटी निर्णय आपलाच असतो,  कुठे थांबायचं?

आजवरच्या प्रवासात अनेकांनी साथ दिली, काहींनी निरोप दिला, काहींनी भरभरून प्रेम दिलं, तर काही ठिकाणं होती,  जिथं फक्त शांतता होती, पण ती मनाला दिलासा देणारी होती.

मनाला खराखुरा आनंद कुठे मिळतो, हे कोणत्याही तर्कावर ठरत नाही. ना ते व्यक्तींच्या दर्जावर ठरतं, ना ठिकाणाच्या वैभवावर. काही वेळा एका साध्याशा चहा टपरीवर मिळालेली मैत्री, किंवा एखाद्या व्यक्तीच्या हास्यातला निरागसपणा,  हेच खरं समाधान देतात.

थांबायचं तिथेच, जिथे आपली किंमत शब्दांपलीकडे केली जाते...
जिथे आपल्या अस्तित्वाला मान मिळतो, आणि मनाला एक अनामिक शांती.

कधी एक गप्पांचा कट्टा, कधी आईच्या हातचा गरम पोळीचा घास, कधी एखाद्या मित्राचा फोन, कधी एका पुस्तकात सापडलेली ओळ,  हे सगळं काहीतरी सांगतं... "थांब इथेच, तू योग्य ठिकाणी आहेस."

आणि व्यक्तींच्या बाबतीतही हेच लागू होतं, 
जिथे नात्यांना प्रयत्न करावा लागत नाही, जिथे आपण आपलेपणाने जगतो, जिथे हसणं आणि रडणं मोकळं असतं,  तिथेच थांबावं. कारण हेच क्षण पुढे जिवंत ठेवतात.

थांबणं म्हणजे थकलं जाणं नव्हे,
तर ते म्हणजे "स्वतःला सापडणं..."

मनाच्या त्या आवाजाला ऐका, जो म्हणतो, "इथे थांब... इथेच तुझं घर आहे."

आपण सगळे प्रवासीच आहोत, पण जेव्हा योग्य ठिकाण सापडतं, 
तेव्हा प्रवासाची गरज संपते... आणि समाधानाची सुरुवात होते.

 सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"