"ऑनलाईन अत्यंविधी आणि डिजिटल चार खांदेकरी – बदलती माणुसकीची रूपरेषा!"

*लेख शीर्षक: "ऑनलाईन अत्यंविधी आणि डिजिटल चार खांदेकरी – बदलती माणुसकीची रूपरेषा!" लेखक: Sunil Pune TM 8007939422*

आज डिजिटल युगात आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत, पण प्रत्यक्ष भेटी मात्र दुर्मीळ झाल्या आहेत. जन्म, वाढदिवस, लग्न, अगदी आनंदाचे क्षणही आता फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि झूम कॉलवर साजरे होतात. एक काळ होता जेव्हा घरात कोणी आजारी असलं, तर नातेवाईक गावभरून भेटायला यायचे. आज मात्र त्याच्या तब्येतीचा अपडेट ‘स्टेटस’वर दिसतो, आणि ‘जलद बरे व्हा’ अशी कमेंट टाकून आपली जबाबदारी संपते.

या वेगवान डिजिटल काळात एक विचार मनात येतो  कदाचित उद्या मृत्यूची बातमीही ऑनलाईनच येईल, आणि अत्यंविधीही झूमवर होईल! कोण जाणे, चार खांदेकरीही आपण डंजो, स्विगी किंवा पोर्टर अ‍ॅपवरून मागवू लागू! मोजक्या वेळात, वेळेवर येणारे आणि नंतर 'ऑर्डर कम्प्लिट' दाखवणारे.

हे दृश्य हास्यविनोदी वाटू शकते, पण यामागे एक भीषण वास्तव दडलेलं आहे  माणुसकीच्या नात्यांची तुटलेली वीण.

पूर्वी कोणाचं निधन झालं की संपूर्ण समाज दुःखात सहभागी व्हायचा. कुठल्याही जाती-धर्माचा विचार न करता सगळे एकत्र यायचे. शेवटचा निरोप देताना माणुसकीचं एक गहिरं दर्शन व्हायचं. पण आज... आज माणूस वेळेच्या गणितात अडकून राहिलाय. आज माणूस “शेवटचं दर्शन व्हिडीओ कॉलवर घेऊ” असंही म्हणतो.

आपण अशी काय घाई करत आहोत की माणूस म्हणूनच मागे पडत चाललो आहोत?

डिजिटल सुविधा ह्या उपयुक्त आहेत  पण नात्यांची उब, जवळीक, आणि माणुसकीचं खरं सौंदर्य याला कधीच टेक्नॉलॉजी बदलू शकत नाही.

भविष्यात कदाचित सगळं ऑनलाईन होईलही, पण ‘माणूसपण’ हे ऑनलाईन करता येईल का?

*या लेखाच्या शेवटी एक विनंती*
आयुष्य जगा सोशल मीडियावर नाही, तर ‘सोशल’ व्हा आपल्या माणसांमध्ये.
कारण शेवटच्या क्षणी सोबत असतात फोटो नाहीत, रील्स नाहीत  तर ती मोजकी माणसं... खरी, हाडामासाची!

सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
( मॅनेजर, MPA, MITफोटोग्राफीक परिक्षक, सामाजिक जाण व माणुसकी जपणारा एक संवेदनशील अभ्यासक, )

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?