जीवनाचे सत्य आणि समजूतदारपणाचे जगणे

*“जीवनाचे सत्य आणि समजूतदारपणाचे जगणे”*
( लेखक  सुनिल पुणे TM 8007939422 ) 
18 जुन 2023

जीवन म्हणजे एक उघड पुस्तक आहे, पण त्यातील अक्षरांचे अर्थ अनेकांना अजूनही उमगलेले नाहीत. आपण रोजच्या धावपळीत ‘जगणे’ तर जगत आहोत, पण खरेच जीवनाचा अर्थ समजून घेतो आहोत का? हाच एक मूलभूत प्रश्न आजच्या काळात प्रत्येक सजग व्यक्तीसमोर उभा ठाकतो.

आजचं युग हे विज्ञान, माहिती आणि डिजिटल वेगाने बदलणारं आहे. लोक जगत आहेत, कमावत आहेत, प्रसिद्ध होत आहेत… पण तरीही अनेकांच्या चेहऱ्यावर असंतोष, गोंधळ, आणि अपूर्णतेचं भाव स्पष्ट दिसतो. याचं कारण म्हणजे "सत्याचा बोध न होणे." जीवन हे फक्त काळ सरणं नाही, तर प्रत्येक क्षणात काहीतरी शिकत, समजत आणि स्वतःला घडवत जगणं हेच खरं जीवन आहे.

जर जीवन फक्त उपभोग घेण्यासाठी असतं, तर इतिहासात संत, विचारवंत, तत्वज्ञ यांची गरज भासली नसती. त्यांनी समाजाला "सत्य" दाखवलं  जे केवळ डोळ्यांनी नव्हे तर अंतःकरणाने पाहिलं जातं. जीवनाच्या अर्थाचा शोध हा केवळ शारीरिक सुखसंपत्ती मिळवण्यात नाही, तर आत्मिक समाधानात आहे.

आज समाजात ताण, द्वेष, स्पर्धा, अहंकार यांच्या सावल्या गडद होत चालल्या आहेत. कारण आपल्याला “कसं जगावं” हे कळतंय, पण “का जगावं” याचं उत्तर मिळालेलं नाही. हे उत्तर शोधण्यासाठी "सत्यबोधक" म्हणजेच मार्गदर्शक विचारांची गरज आहे. अशा विचारांमुळे माणूस स्वतःच्या जीवनाकडे नव्या दृष्टिकोनाने पाहू लागतो. मग ते संत तुकाराम, गजानन महाराज,  गाडगेबाबा असोत, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा अगदी आपल्या घरातील थोडा अधिक अनुभवी माणूस  हेच सत्यबोधक आपल्याला जागं करतात.

जीवनाची प्रगती केवळ आर्थिक उन्नतीत नाही, तर नैतिक आणि मानसिक समृद्धीत आहे. जीवनाचा अर्थ समजून घेतल्याशिवाय, आपल्याला मिळालेली प्रत्येक संधी, यश, माणसं  या सगळ्यांची खरी किंमत कधीच समजणार नाही.

म्हणूनच, जीवन हे एक “सत्य शोधण्याचं” प्रवास आहे.
हे सत्य केवळ ग्रंथांत नाही, तर प्रत्येक अनुभवात दडलेलं आहे. त्यासाठी अंतर्मुख होण्याची गरज आहे. अशा अंतर्मुखतेतूनच आपल्याला जीवनाचं समाधान, उद्दिष्ट आणि खरा आनंद मिळतो.

जीवनाच्या प्रवासात ‘सत्याचा बोध’ हाच आपला मार्गदर्शक ठरतो. केवळ जगण्यासाठी न जगता, सत्य समजून प्रगल्भतेने, समजूतदारपणे जगणं  हेच यशस्वी आणि समाधानी जीवनाचं खऱ्या अर्थाने परिमाण आहे.

सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
(फोटोग्राफी व ऑफसेट प्रिटिंग क्षेत्रातील अभ्यासक, प्रशिक्षक, ब्लॉगर, प्रेरणादायक वक्ते)

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"