क्षणांचं सोनं करा....!
*"क्षणांचं सोनं करा..." लेखक : सुनिल पुणे TM 8007939422*
"जो नसीब मे है वो चलकर आयेगा, जो नही है वो आकर भी चला जायेगा..."
हे वाक्य ऐकताना मनात खोलवर जाणवतं आयुष्यात आपण धावत असतो, झगडत असतो, पण काही गोष्टी आपल्या नियतीतच नसतात. मग त्या कितीही हात जोडून मागितल्या तरीही मिळत नाहीत. आणि ज्या गोष्टी आपल्या नशिबात असतात, त्या कुठूनही, कशाही येतात आणि आयुष्याला एक नवा अर्थ देऊन जातात.
म्हणूनच, इतकं सीरियस घेऊन काय उपयोग?
आपण सर्व जण या पृथ्वीवर एका ठराविक वेळेसाठी आलो आहोत. कुणी थोडं आधी निघतो, कुणी थोडं उशिरा... पण शेवटी जायचं सगळ्यांनाच आहे.
इथे कोणीच "जिंदा बचकर" जात नाही.
मग का उगाच चिंता करत बसायचं?
का उगाच दुःखाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं?
का आयुष्य घालवायचं "कळतंय पण वळत नाही" या अवस्थेत?
हो, एक कटू सत्य हेही आहे की,
जर जीवन इतकं सुंदर असतं, तर आपण या जगात जन्माला येताना हसत आलो असतो ना!
पण आपण आलो रडत रडत कारण ही दुनिया आपल्यासाठी नवीन होती, वेगळी होती, आणि कदाचित कठीणसुद्धा!
पण त्याचबरोबर एक गोड सत्य देखील आहे
जर ही जिंदगी एवढी वाईट असती,
तर आपण जाताना इतक्यांना रडवून का गेलो असतो?
का इतके जिवलग, मित्र, कुटुंबीय आपल्या आठवणींनी ओलावले गेले असते?
त्यामुळेच... "जी ले आज, कल किसने देखा है..."
हा डायलॉग नव्हे, तर एक सजीव मंत्र आहे.
आजचा क्षण आहे, तो जगून टाका...
हसून घ्या, प्रेम करा, कोणाला तरी माफ करा, कोणालातरी मिठी मारा...
कारण उद्या असेलच याची काही हमी नाही.
आयुष्य म्हणजे नेमकं काय?
हे काही एका मोठ्या योजनेसारखं नाही, जिथे सर्व काही परफेक्ट असतं.
हे म्हणजे एका चाळीच्या गॅलरीत बसून चहा पितानाचा वारा,
आईच्या हातचं गरम पोळीचा पहिला घास,
मित्रांसोबत शेवटचा फेरीत घेतलेला वडा-पाव,
आणि एखाद्या प्रेमळ माणसाच्या डोळ्यातली "काळजी"ची चमक.
हे सगळं मिळतं, अनुभवता येतं फक्त एक अट आहे आज जगायला शिका.
रोज सकाळी डोळे उघडले, तर देवाचे आभार माना,
कुणी सोबत असेल तर त्याला प्रेमाने पहा,
कुणी गेले असेल, तर त्याच्या आठवणी जपून ठेवा.
कारण शेवटी आयुष्य हे क्षणांचं गाठोडं आहे
ज्याने ते उघडून क्षणांचं सोनं केलं, तो खरा श्रीमंत!
सुनिल पुणे TM 9359380065. Sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment