"वृद्ध होत चाललेले पालक आणि व्यस्त होत चाललेली डिजिटल मोबाईल पिढी, हिच खरी नात्यांतील अदृश्य दरी"

"वृद्ध होत चाललेले पालक आणि व्यस्त होत चाललेली डिजिटल मोबाईल पिढी, हिच खरी नात्यांतील अदृश्य दरी"
लेखक: सुनिल पुणेTM 9359850065.

समाजातील अनेक प्रश्नांवर आपण चर्चा करतो जसे स्त्रीभ्रूणहत्या, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार, डिजिटल व्यसन, पर्यावरण. पण एक विषय असा आहे, जो आपल्या डोळ्यासमोर रोज घडतो, तरी त्यावर फारसं कोणी बोलत नाही. तो विषय म्हणजे, जिवंत असलेल्या पालकांच्या भावनिक एकाकीपणाचा.

हो, वृद्धाश्रम हा विषय वेगळा आहे. तो दिसतो. त्यावर लेख लिहिले जातात. पण ज्या घरात आई-वडील आपल्या मुलांसोबतच राहतात, तरीही आतून एकाकी, उपेक्षित आणि न बोललेले दु:ख घेऊन जगत असतात, त्या भावनिक अंतरावर कोणी भाष्य करत नाही.

आजची पिढी अत्यंत कर्तबगार आहे. शिक्षण, करिअर, पैसा, परदेशी संधी, डिजिटल, मोबाईल जग हे सर्व काही त्यांच्या हातात आहे. पण या धावपळीत एक गोष्ट नकळत हरवत चालली आहे, ती म्हणजे  आई वडिलांसोबतचा संवाद.

आपण त्यांना सर्व सोयी देतो एसी खोली, टीव्ही, औषधे, चांगले अन्न. पण त्यांना हवं असतं ते फक्त दोन क्षणांचं मनापासून बोलणं. त्यांना पैशांची गरज नसते, त्यांना गरज असते फक्त आपुलकीची.

वृद्ध आई जेव्हा स्वयंपाकघरात शांतपणे बसलेली असते, तेव्हा तिच्या मनात किती प्रश्न असतातकी,  “मुलगा दिवसभर इतका व्यस्त का असतो?”, “माझ्याशी दोन शब्द बोलायला त्याला वेळ का मिळत नाही?”
वडील जेव्हा गच्चीत एकटे बसतात, तेव्हा त्यांची नजर रस्त्याकडे नसते, ती आपल्या मुलाच्या चेहऱ्याकडे असते की, जो मुलगा दिवसेंदिवस त्यांच्यापासून दूर जातो आहे.

ही दरी भांडणामुळे नाही तर ती निर्माण होते वेळेअभावी.
आणि वेळ नसतो असं नाही तर प्राधान्य नसतं.

आपण सोशल मीडियावर शेकडो लोकांशी जोडलेले असतो. पण आपल्या घरातील दोन जीवांशी तुटलेले असतो.
आपण “फॅमिली फर्स्ट” म्हणतो, पण प्रत्यक्षात “वर्क फर्स्ट” जगतो.

आई-वडिलांना कधी कधी आपल्या घरात पाहुण्यासारखं वाटू लागतं. त्यांना निर्णयांमध्ये विचारलं जात नाही. त्यांची मतं जुनी समजली जातात. त्यांचा अनुभव अप्रासंगिक मानला जातो.
ही उपेक्षा शब्दांनी नसते तर, ती वागण्यातून जाणवते. आणि हा विषय दुर्लक्षित का राहतो? तर, 
कारण यात कोणताही मोठा गाजावाजा नाही. यात आंदोलन नाही, घोषणाबाजी नाही. हा प्रश्न घराच्या चार भिंतीत घडतो आणि तिथेच गुपचूप संपतो.

कारण आपण मुलं म्हणून कर्तव्य पूर्ण केल्याचा समज करून घेतो, आर्थिक जबाबदारी पार पाडून. पण भावनिक जबाबदारी मात्र अपूर्णच राहते. आई वडिलांनी आपल्या बालपणात आपल्यासाठी वेळ काढला. आपले लहान प्रश्नही त्यांनी मोठ्या मनाने ऐकले.
आज त्यांचे मोठे प्रश्न आपण लहान समजून दुर्लक्षित करतो.

वृद्धत्व म्हणजे फक्त शरीराचं कमकुवत होणं नाही, तर आपल्या मुलांच्या आयुष्यातील स्वतःची भूमिका कमी होत चालल्याची जाणीव असते, हीच खरी वेदना आहे.

आजच्या काळात एक नवीन प्रकारचं अनाथपण जन्माला आलं आहे ते म्हणजेच जिवंत पालकांचं भावनिक अनाथपण.

यावर उपाय काय? तर
उपाय मोठा नाही.
दररोज दहा मिनिटं मनापासून संवाद.
आठवड्यातून एकदा एकत्र बसून चहा.
त्यांच्या आठवणी ऐकणं.
त्यांच्या अनुभवाला मान देणं.
आणि सर्वात महत्त्वाचं “तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात” हे जाणवून देणं.

समाज बदलण्यासाठी मोठ्या क्रांतीची गरज नसते.
घरातील नात्यांमध्ये ऊब निर्माण झाली, की समाज आपोआप संवेदनशील होतो.

आपण वृद्धाश्रमांविषयी बोलतो, पण आपल्या घरातल्या शांतपणे रडणाऱ्या मनांविषयी कधी बोलणार?

आज वेळ आहे 
आपल्या पालकांना “ओझं” नव्हे तर “आधारस्तंभ” मानण्याची.
त्यांच्या जगण्यात आपली उपस्थिती पुन्हा जिवंत करण्याची. कारण उद्या आपणही वृद्ध होऊ.
आणि त्या वेळी आपल्या मुलांनी आपल्याशी कसं वागावं, याचं उत्तर आपण आजच्या वागण्यातूनच लिहित आहोत.

लेखक: सुनिल पुणेTM 9359850065, topsunil@gmail.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?