एका विधवेचे मनोगत माझ्या शब्दातून..समाजाची बेडी आणि अस्तित्वाची लढाई...
एका विधवेचे मनोगत माझ्या शब्दातून..समाजाची बेडी आणि अस्तित्वाची लढाई...
सुनिल पुणे TM 8007939422.
आज आपण 21व्या शतकात जगतो आहोत, डिजिटल युगात वावरतो, मोबाईलवरून जग चालवतो, पण दुःखाची गोष्ट ही आहे की, आपल्या समाजात विधवा स्त्रीच्या वाट्याला येणारे दु:ख अजूनही मध्ययुगीन काळासारखेच आहे.
पती गमावल्यावर स्त्रीचं आयुष्य संपत नाही, पण समाज मात्र तिला जणू "पूर्ण झालीस आता" अशा नजरेने पाहतो. तिचं दुःख समजून घेण्याऐवजी तिला धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवलं जातं. सणसमारंभात तिची उपस्थिती "अपशकुन" समजली जाते. आजही काही घरांत ‘ती विधवा आहे, त्यामुळे ती पूजा करू नये, हळदीला येऊ नये’ असे नियम ऐकायला मिळतात. ही गोष्ट केवळ वेदनादायक नाही, तर लज्जास्पद आहे.
इतकंच नव्हे, तर माहेरची माणसेही काही काळानंतर हात झटकतात. आधी जे आधार वाटायचे, ते हळूहळू निघून जातात. आणि मग उरते एकटेपणाची काळोखी खोली.
या स्त्रीच्या आयुष्यात जर दुसऱ्यांदा प्रेम, साथ, आधार यांची ओढ निर्माण झाली तर...? तर त्या वाटेलाही समाज अडथळे उभे करतो. विधुर पुरुष जर दुसऱ्या लग्नासाठी पुढे आला, तर त्याला तरुण, सुंदर, समजूतदार पत्नी सहज मिळते. पण विधवा स्त्रीचं तसं नाही. तिच्या बाबतीत विचार केला जातो "ही तर मूलबाळ असलेली स्त्री आहे", "काहीतरी कारणाने विधवा झाली असेल", "दुसऱ्या लग्नात कशाला घालायचं पाय?" अशा वागणुकीमुळे तिचं दुसरं लग्न म्हणजे एक कठीण पर्वत चढण्यासारखं बनतं.
मुलींच्या बायोडेटा मध्ये "विधवा" ही एक ओळ समाजाच्या नजरेत "बोजा" ठरते. तिच्या आत्मसन्मानाला गालबोट लावून, अनेक वेळा तिला "कॉप्रमाईज" करावं लागतं. आणि ती जर कधी स्वतःच्या भावनांप्रती प्रामाणिक राहिली, दुसऱ्यांदा संसार सुरू करायचा प्रयत्न केला, तर लोकं म्हणतात "पती मेल्यावर एवढी काय घाई होती?"
इतकं सगळं असूनही ती स्त्री लढते मुलांच्या भविष्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी. ती शिकते, काम करते, जबाबदाऱ्या पार पाडते, आणि तरीही समाजाला तिच्या दुःखाची किंमत कधीच समजत नाही.
या सगळ्यात एक गोष्ट ठळकपणे जाणवते या स्त्रीला सहानुभूती नको आहे, तिला गरज आहे समान वागणुकीची, समजून घेणं आणि समर्थन देण्याची. विधवा स्त्रीही इतरांसारखीच एक स्त्री आहे तिला पण भावना असलेली, प्रेम करण्याची आणि मिळवण्याची पात्रता असलेली. तिच्या दु:खाला हळूहळू तिचं दुसरं आयुष्य फुलवण्याचा हक्कही आहे.
आजचा समाज शिक्षण, तंत्रज्ञान, डिजिटल विकास यामध्ये कितीही पुढे गेला असला, तरी तो खरा प्रगत तेव्हाच होईल, जेव्हा विधवा स्त्रीला समाजात सन्मानाने जगता येईल, नव्या आयुष्याची सुरुवात करता येईल, आणि कोणत्याही कार्यक्रमात ती ‘दु:खदायक’ म्हणून नाही तर माणूस म्हणून सहभागी होईल.
विधवत्व हे दुःखाचं नाव नाही, तर नव्याने उभं राहण्याची एक संधी असू शकते जर समाज तिचा हात धरायला तयार असेल.
सुनिल पुणे TM 9359850065,
sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment