एक स्त्रीचं मनोगत, समाजाच्या चौकटीत अडकलेलं स्वत्व, माझ्या शब्दातून, नक्की अभिप्राय द्यावा,

एक स्त्रीचं मनोगत,  समाजाच्या चौकटीत अडकलेलं स्वत्व, माझ्या शब्दातून, नक्की अभिप्राय द्यावा,
सुनिल पुणे TM 8007939422

आजच्या डिजिटल युगात आपण विज्ञानात, तंत्रज्ञानात आणि जीवनशैलीत झपाट्याने पुढे जात आहोत, पण मनोवृत्तीत होणारा बदल मात्र काही ठिकाणी आजही घसरतो आहे. विशेषतः त्या स्त्रीबाबत जी आपल्या आयुष्यातील जोडीदार जेव्हा गमावते तेव्हा हा समाज तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही काळोखात अडकलेला विचारांचा आहे.

ती स्त्री एक दु:खद वळण अनुभवून पुढे चालते आहे, पण समाज मात्र तिला वेगळी ओळख लावून तिचं माणूसपण, तिचं स्त्रीत्व कमी करत जातो. ती सण-समारंभात सहभागी झाली, तर काही लोकांच्या कपाळावर आठ्या येतात. धार्मिक कार्यक्रमात तिचं असणं "अपशकुन" मानणारी मानसिकता अजूनही काही घरांत खोलवर रुजलेली आहे.

ती स्त्री एकटी राहू लागली की काहीजण तिला सहानुभूतीच्या नजरेतून पाहतात, तर काहीजण संधीचं साधन म्हणून. समाजाची नजर, टोमणे, आणि नकारात्मक वागणूक यामुळे तिचं दुःख दुप्पट होतं. इतकंच काय, तिच्या दुसऱ्या विवाहाचा विचार जरी तिने केला, तरी तिला "हक्काने" ते करण्याचा अधिकार कुणीच सहज देत नाही.

वास्तविक, समाजातील दुसरी बाजु अशी आहे, जेव्हा एखादा पुरुष आपली पत्नी गमावतो, तेव्हा तो पुन्हा संसार थाटतो, आणि बरेचदा त्याला तरुण, देखणी जोडीदार सहज मिळते. पण ती स्त्री जेव्हा नव्या नात्याचा विचार करते, तेव्हा समाज तिला ‘जुनी’, ‘बोजा’, ‘मूलबाळ असलेली’ अशा नजरेने पाहतो. तिच्या पुनर्विवाहात अडथळे उभे राहतात, जणू तिचं पुन्हा प्रेमात पडणं किंवा आयुष्याला नवीन सुरुवात करणं हे गुन्हा असल्यासारखं.

ती स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहू लागली, की तिला "बोल्ड", "मोकळी", "स्वार्थी" अशी टीका सहन करावी लागते. पण तिला कोणी विचारत नाही की ती जगण्यासाठी, मूलांसाठी, तिच्या अस्मितेसाठी लढते आहे. तिच्या आयुष्यात प्रेम, आधार, आणि सन्मान हवेत असणे हे तिचे मानवी हक्क आहेत,  त्याला कोणीही नाकारू शकत नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर समाजाची जबाबदारी ही आहे की, अशा स्त्रीला फक्त "विधवा" म्हणून पाहू नये, तर "एक स्त्री" म्हणून पाहावं,  जी सशक्त आहे, संवेदनशील आहे, आणि आपल्या दुःखावर मात करून नव्याने उभी राहते आहे.

ती एक विधवा नाही तर ती प्रथम एक स्त्री आहे!
ती दुःखाने मोडलेली नाही, ती जीवनाशी पुन्हा नातं जोडण्यासाठी सज्ज आहे.
तिला सहानुभूती नको तर तिला समानता हवी आहे.

सुनिल पुणे TM 9359750065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

फोटोेग्राफी विश्व

माणसाला आयुष्यात खरोखर काय पाहिजे असतं…?लेखक : सुनिल पुणे TM

जिथे मान नाही, तिथे थांबणं आम्हाला मान्य नाही…लेखक सुनिल पुणेTM