स्त्रीच्या मनातील खोल सागरातील खळबळ, एक अंतर्मनोगत
स्त्रीच्या मनातील खोल सागरातील खळबळ, एक अंतर्मनोगत
लेखन सुनिल पुणे TM 8007939422
मी एक साधी, सामान्य स्त्री आहे. शिक्षण झालं, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत मोठी झाले. स्वप्न होतं प्रेमाचं, संसाराचं, आणि आपल्या माणसांत जगण्याचं. पण हे स्वप्नच होतं... वास्तव वेगळंच होतं. लग्न झालं... पण ते प्रेमाचं नव्हतं की समजूतदारपणाचं नव्हतं. ते एक सामाजिक करार होतं. समाज म्हणतो, वय झालं म्हणजे लग्न झालंच पाहिजे.
लग्नात 'मुलगी पाहून योग्य स्थळी दिली' असं सगळ्यांना वाटलं... पण माझं मन कुणी पाहिलं का हो ? माझ्या स्वभावाशी, मनोवृत्तीशी तो माणूस नवरा किती वेगळा होता हे कुणी समजून घेतलं का हो ?
त्याचं वागणं... बोलणं... मन दुखावत राहिलं. तो नवरा होता पण 'जीवनसाथी' नव्हता. माझ्या भावना, माझं अस्तित्व, माझी माणूस म्हणून गरज... याला काहीच स्थान नव्हतं त्या नात्यात.
शारीरिक, मानसिक त्रास झाला तरी आई-बाबा म्हणाले होते, "सहन कर. समाज काय म्हणेल?" समाज काय म्हणेल हे वाक्य एवढं मोठं झालं, की माझं दुःख पण छोटं पडलं.
आज मी जगते पण एक मोलकरीण बनून. नवऱ्याच्या घरात, मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळत, स्वतःचं आयुष्य हरवून बसलेय. दुःखाची गोष्ट म्हणजे मी एकटीच नाही तर अशा अनेक स्त्रिया आहेत... फसलेल्या लग्नात अडकलेल्या, पण निघू शकत नाहीत... कारण समाज, प्रतिष्ठा आणि नाती व केविलवाणे संस्कार .
दुसरीकडे, एक माझी मैत्रीण आहे, शिकलेली, सुंदर, स्वाभिमानी. तिने तिच्या मनासारखा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला... पण वेळ व वय गेले.
कधी वडिलांची बदनामी होईल म्हणून नाही केल, तर कधी भाऊ म्हणे "तुझ्या वागण्यामुळे आमचं लग्न होणार नाही." शेवटी तिनं स्वप्न गमावली, आणि वयाचा काळ लोटून दिला. आता ती एकटी राहते. लोक विचारतात, "लग्न नाही केलं का अजुन ? अहो, काही तरी अडचण असेल..."
कोणी विचारत नाही, तिने का नाही केलं ? कोणी समजून घेत नाही, की तिनं त्याग केला... तुमच्यासाठीच कौटुंबिक इज्जतीसाठी.
आज डिजिटल युग आलंय... पण माणुसकी कुठं आहे?
सोशल मीडियावर सगळे "फॅमिली मॅन", "स्ट्रॉंग वुमन" असे स्टेटस ठेवतात... पण एखाद्या असहाय स्त्रीच्या जगण्यात कुणी सहभागी होतं का? समाज कुठे असतो सोबत, तो फक्त बोलत असतो..
माझं मन आज ही सांगतं की,
"स्त्री ही केवळ आई, पत्नी, प्रेयसी, बहीण किंवा मुलगी नसते... ती स्वतः एक स्वतंत्र व्यक्ती आहे." तिला बंधनात ठेवणं म्हणजे तिच्या अस्तित्वाशी खेळ करणं आहे.
तिला पण स्वप्नं बघू द्या... स्वतःसाठी जगू द्या. तिचे मन आजही मी विचार करते की, गेला तो काळ? का नाही उठली मी तेव्हा ?
शेवटी हेच म्हणावं लागतं, "नशिबावर नव्हे, समाजाच्या अपेक्षांवर हार मानली मी...
पण मनात अजूनही स्वप्नांचं एक कोपरा जिवंत आहे..." मी अजुन ही जिवंत आहे फक्त संसारासाठी, समाजासाठी....पण माझे कोणीच नाही ...ना माहेर, ना सासर, ना समाजात, मी फक्त एकटीच.....
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
(स्त्री हक्कांचा आणि मनाच्या वेदनांचा आवाज)
Comments
Post a Comment