जीव लावलेला असतो म्हणून तर त्रास होतो…
जीव लावलेला असतो म्हणून तर त्रास होतो…सुनिल पुणेTM 8007939422
माणसाच्या आयुष्यात किती तरी चेहरे येतात, जातात. हजारो लोकांशी भेट होते, काही क्षणांसाठी संवाद होतो, काहींना पुन्हा आठवतही नाही. पण कधी कधी मात्र एखादा साधासुधा, अनोळखी वाटणारा चेहरा मनाला भिडतो. काही कारण नसताना तो चेहरा मनाच्या कॅनव्हासवर कायमचा उमटून जातो.
खरं तर त्याचं आयुष्यात असणं वा नसणं याने आपल्या दिनचर्येला फारसा फरक पडत नाही, पण मनाच्या गाभाऱ्यात एक अदृश्य नातं जुळतं. जीव लावलेला असतो म्हणून तर त्रास होतो. एखाद्या हास्याने हृदयात हलकेच ठसे उमटतात, एखाद्या नजरेत आपुलकीचा उजेड दिसतो, आणि मन नकळत त्याला खास मानायला लागते.
जीव लावण्यामागे तर्क नसतो, कारण नसतं… ती एक हृदयाची सहज प्रतिक्रिया असते. आणि मग हाच जीव लावलेला आपल्याला सुखही देतो, पण त्रासही देतो. कारण जितकी माणसं आपल्याला महत्त्वाची वाटतात, तितकीच त्यांच्या गैरहजेरीची, त्यांच्या दुराव्याची टोचणी जास्त लागते.
एक अनोळखी चेहरा उगीच खास का होतो? कदाचित आपण नकळत त्या चेहऱ्यात आपल्या भावनांचा, आपल्या कमतरतेचा, आपल्या अपूर्णतेचा आधार शोधत असतो. म्हणून त्याचं महत्त्व वाढतं. पण त्या नात्याला नाव नसतं, ओळख नसते, तरीही मन त्याला खास मानत राहतं.
खरं सांगायचं तर जीव लावणं ही एक कमकुवतपणाची खूण नाही, तर ती आपल्या हृदयाच्या जिवंतपणाची साक्ष आहे. जोवर आपण कोणावर तरी जीव लावतो, तोवर आपल्या मनात प्रेमाची ओल आहे, आपुलकीची ऊब आहे. आणि हीच ऊब आपल्याला माणूस बनवते, संवेदनशील ठेवते.
म्हणूनच जीव लावून त्रास होतो, तरीही तो त्रास गोड असतो… कारण त्या त्रासाशिवाय जगणं म्हणजे खरं तर रिकामेपणाचं दुःख आहे.
सुनिल पुणे TM 9359850065
sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment