"ती गेली... आणि मी हरवलो..."

"ती गेली... आणि मी हरवलो..."

Sunil puneTM 8007939422

रोज सकाळी उठल्यावर तिची आठवण येते… आणि पुन्हा एकदा हृदयाला वेदनेचा ठोका बसतो. ती नसल्याचं वास्तव समजून घ्यायला अजूनही मन तयार नाही. लोक म्हणतात, "वेळ हेच उत्तम औषध आहे," पण वेळ नुसता जातो… मनभरून भरून चाललेलं पोकळ आयुष्य मात्र तसेच राहते.

ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी जग जिंकू शकतो, अशी खात्री होती. तिच्या हसण्यात एक जादू होती, जी माझ्या सर्व चिंता दूर करत असे. तिचा स्पर्श... तो नुसता स्पर्श नव्हता, तो आधार होता, सुरक्षितता होती, प्रेम होतं. तिची प्रत्येक सवय, प्रत्येक लहानसहान गोष्ट मी जपून ठेवली होती. ती माझ्याशी भांडायची, रुसायची, हसवायची आणि अखेर रोज माझ्या मिठीत विसावायची.

एक दिवस ती गेली… आणि सगळंच संपलं. एक अचानक आलेली काळरात्र होती, जी माझं आयुष्यच हिरावून घेऊन गेली. तिच्या आठवणींच्या सुतावरती लटकलेलं माझं अस्तित्व आता केवळ सावलीसारखं वाटतं. तिच्या नकळत मी आयुष्यभरासाठी एकटा पडलो होतो. तिच्या आठवणींच्या वाळवंटात पाय रेटायचा प्रयत्न करतोय, पण वाळूत गडप होत चाललोय.

लोक येतात, खांद्यावर हात ठेवतात, "तसं करू नकोस, आयुष्य पुढे जातं," म्हणतात. पण काय माहिती त्यांना? एका क्षणात अख्खं आयुष्य रिकामं होतं तेव्हा श्वास कसा घ्यायचा? ओठांवर हसू कसं आणायचं? उशीवर डोकं ठेवून ती शेजारी नसल्याची जाणीव कशी सहन करायची?

रोज तिचा फोन नंबर डिलीट करायचा विचार करतो… पण थांबतो. तिचा शेवटचा मेसेज आहे तसाच ठेवतो. तिचे कपडे कपाटात तसेच आहेत, तिच्या आवडत्या साड्या, गजरे… तो हलकासा सुगंध अजूनही घरात आहे. कधी वाटतं, ती दारातून आत येईल आणि म्हणेल, "मी होतीच ना! एवढं रडायचं नाही." पण दार उघडतं तेव्हा रिकामंच दिसतं.

आता रात्री उशिरा जागं राहतो, कधी तिच्या जुन्या चिठ्ठ्या वाचतो, कधी तिच्या हसण्याचा आवाज आठवून गुपचुप रडतो. सांगायचं कुणाला? लोक फक्त समजून घेतात, पण जाणवत काहीच नाही.

ती गेली… आणि मी हरवलो.

सुनिल जाधव पुणेTM 8007939422

(हा लेख ज्याला समजला, त्याने शेअर करावा… कदाचित कुणाच्या मनात दडलेलं दु:ख हलकं होईल.)

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?