“खरं प्रेम म्हणजे श्वास”
“खरं प्रेम म्हणजे श्वास” लेखक सुनिल पुणेTM 9359850065.
हॉस्पिटलच्या खोलीत मंद प्रकाश होता. मशीनचा आवाज सतत कानात घुमत होता. भिंतीवरचं घड्याळ हळूहळू चालत होतं आणि त्या टिक-टिकच्या मध्ये निल छताकडे शून्यात नजर लावून पडला होता. डोळे उघडे होते, पण मन कुठेतरी खूप दूर अडकलेलं होतं. श्वास घ्यायला त्याला त्रास होत होता. ऑक्सिजनची लेव्हल ८२ ते ८४ दरम्यान हेलकावत होती. डॉक्टरांनी त्याच्या नातेवाइकांना स्पष्ट सांगितलं होतं की पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. पण निलला त्या शब्दांपेक्षा जास्त वेदना देणारी गोष्ट वेगळीच होती. त्याच्या मनात सतत एकच नाव घोळत होतं "मनिषा".
तीन वर्षांचं प्रेम, रोजचे फोन, निरागस भांडणं, एकमेकांशिवाय न राहण्याची सवय… पण दोन महिन्यांपूर्वी एका गैरसमजामुळे सगळं उद्ध्वस्त झालं होतं. छोट्या विषयावरून झालेलं भांडण इतकं वाढलं की दोघांनीही एकमेकांना दुखावणारे शब्द बोलले. मनिषाने अनेकदा फोन केला, पण निलने उचलला नाही. निलनेही तिचा नंबर ब्लॉक केला. दोघे जिवंत होते, पण नातं जणू मृत झाल्यासारखं झालं होतं. आज त्या बेडवर पडून निलला जाणवत होतं की आपण प्रेमावर राग धरला आणि आज स्वतःच्या श्वासासाठी झगडतोय.
तेवढ्यात मोबाईल वाजला. त्या शांततेत तो आवाज जणू निलच्या हृदयात थेट घुसला. त्याने थरथरत्या हाताने स्क्रीनकडे पाहिलं. नाव झळकलं “Manisha”. डोळे पाणावले. सगळ्या आठवणी एका क्षणात डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. मन म्हणत होतं, फोन उचलू नकोस, अजून राग आहे, अजून वेदना आहेत. पण रिंग थांबत नव्हती. पुन्हा वाजली. अखेर निलने डोळे मिटले आणि कॉल उचलला.
पलिकडून तिचा थरथरता आवाज आला. ती म्हणाली, “निल, मला माहिती आहे तू माझ्यावर रागात आहेस. मला माहिती आहे मी चुकीची होते. पण तू आजारी आहेस हे कळल्यावर मी स्वतःला थांबवू शकले नाही. आपलं भांडण माझ्या मनातून कधी गेलंच नाही. पण त्यापेक्षा मोठं आहे तू… तुझं अस्तित्व.” निल काही बोलू शकत नव्हता. घसा कोरडा पडला होता. फक्त तिचं नाव कुजबुजत बाहेर पडलं. मनिषा पुढे म्हणाली, “मी तुला हरवू शकत नाही. तू माझा श्वास आहेस. आपलं प्रेम म्हणजे सवय नाही, ती गरज आहे.” निलच्या छातीत दडपलेलं काहीतरी तुटून बाहेर आलं. तो हळूच म्हणाला, “मला माफ कर.” मनिषा रडत म्हणाली, “आपण दोघेही चुकलो, पण आपलं प्रेम चुकीचं कधीच नव्हतं.”
फोन ठेवताच निलला वेगळंच जाणवलं. छातीतली जडणूक हलकी झाली. श्वास जरा मोकळा झाला. मन शांत झालं. जणू प्रेमाने त्याला पुन्हा जगायला शिकवलं होतं. संध्याकाळी डॉक्टर तपासणीसाठी आले. मशीनकडे पाहून ते आश्चर्यचकित झाले. ऑक्सिजनची लेव्हल ९५ होती. डॉक्टरांनी विचारलं, “हे अचानक कसं काय?” निल हसून म्हणाला, “डॉक्टर साहेब, हे प्रेमाचं ऑक्सिजन आहे… मनिषाने दिलेलं.” डॉक्टर हलकेच हसले आणि म्हणाले, “मानसिक बळ हेच सर्वात मोठं औषध आहे.”
दुसऱ्या दिवशी निलला डिस्चार्ज मिळाला. हॉस्पिटलच्या गेटसमोर मनिषा उभी होती. डोळे भरलेले, चेहऱ्यावर भीती आणि आशा दोन्ही. निल हळूच पुढे गेला. क्षणभर थांबला आणि तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत सगळं सामावलं होतं, माफी, वेदना, प्रेम आणि नवी सुरुवात. त्या क्षणी दोघांनाही कळलं की खरं प्रेम शब्दांत नसतं, ते श्वासात असतं.
त्या दिवसानंतर निल आणि मनिषा यांनी ठरवलं की कधीही अहंकाराला प्रेमाच्या आड येऊ देणार नाही. राग क्षणिक असतो, पण प्रेम आयुष्यभराचं असतं. कधी कधी आपण जिंकण्यासाठी भांडतो, पण हरवतो ते आपलं माणूस. आयुष्याच्या शेवटी पैसा, प्रतिष्ठा, यश काहीच साथ देत नाही, साथ देतं ते फक्त प्रेम. निल आणि मनिषा यांच्या कथेतून हेच शिकायला मिळतं की खरं प्रेम म्हणजे ऊर्जा आहे, जी आपल्याला जगण्याचं बळ देते. म्हणून प्रेम जपा, नाती जपा, कारण प्रेम हेच खऱ्या अर्थाने जीवनाचं ऑक्सिजन आहे.
लेखक सुनिल पुणेTM 93598 50065, topsunil@gmail.com
Comments
Post a Comment