शेंदूर लावून दगड देव होतो, माणूस का नाही ?
शेंदूर लावून दगड देव होतो, माणूस का नाही ? तर ?
रंग देवासाठी पुरतो, माणसासाठी संस्कार लागतात...सुनिल जाधव पुणे , 9359850065
दगडाला देवत्व देणं माणसाला जमलं. एक मूर्ती, थोडी श्रद्धा, थोडा शेंदूर, फुलं-फळं, आणि हात आपोआप जोडले जातात. त्या दगडात देव आहे असं मानायला आपल्याला फार विचार करावा लागत नाही. कारण तिथे अपेक्षा कमी असतात. देवाकडून आपण चूक माफ करून घ्यायची, संकट टळावीत एवढीच अपेक्षा ठेवतो. पण माणसाकडून मात्र आपण माणूसपणाची अपेक्षा करतो. आणि इथेच सगळा गोंधळ सुरू होतो.
माणूस दिसायला रंगीत आहे, पण आतून अनेकदा कोरडा, करडा, संवेदनाहीन असतो. बाहेरून गोड बोलणं, आतून विषारी विचार, वरून नीटनेटका व्यवहार आणि मागून घाव घालण्याची तयारी , हे सगळं आज सहज स्वीकारलं जातं. मग प्रश्न पडतो, माणसाला खरंच कोणता रंग दिला तर तो माणूस बनेल?
कारण रंग म्हणजे फक्त दिसणं नाही. रंग म्हणजे वृत्ती. रंग म्हणजे विचारांची छटा. कुणाच्या डोळ्यात दया दिसते, कुणाच्या वागण्यात संवेदना जाणवतात, कुणाच्या शब्दांत आधार असतो हे सगळे रंग माणसाला माणूस बनवतात. पण हे रंग दुकानात मिळत नाहीत, ना पूजा थाळीत ठेवता येतात.
आज आपण देवासाठी वेळ काढतो, पण समोरच्या माणसासाठी थांबत नाही. देवासाठी उपवास करतो, पण माणसाशी बोलताना संयम ठेवत नाही. देवाच्या मूर्तीसमोर नम्र होतो, पण जिवंत माणसासमोर अहंकार सोडायला तयार नसतो. हे विरोधाभास आपल्याला अस्वस्थ करत नाहीत, कारण आपण त्याला ‘सामान्य’ मानायला शिकलो आहोत.
खरंतर माणूस घडवायला रंग नको, संस्कार लागतात. ऐकण्याची सवय लागते, समजून घेण्याची तयारी लागते, आणि चूक मान्य करण्याचं धाडस लागते. माणूस माणूस बनतो तो मोठ्या भाषणांनी नाही, तर छोट्या कृतींनी. कुणाच्या दुःखात शांतपणे बसणं, कुणाच्या यशावर मनापासून आनंद मानणं, आणि कुणाच्या चुकीवरही माणुसकीनं प्रतिक्रिया देणं हेच खरे रंग आहेत.
दगडाला देव बनवणं सोपं आहे, कारण तो प्रतिकार करत नाही. पण माणसाला माणूस बनवणं कठीण आहे, कारण त्यासाठी आपल्यालाच बदलावं लागतं. आपली भाषा, आपली नजर, आपली वृत्ती सगळीकडे थोडा मृदूपणा आणावा लागतो. आणि हा बदल बाहेरून लावता येत नाही, तो आतून उमटावा लागतो.
कदाचित म्हणूनच आज देवांची संख्या वाढतेय, पण माणुसकी कमी होत चाललीय. आपण देव शोधतोय, पण माणूस हरवतोय. मंदिरं भरतात, पण मनं रिकामी राहतात. कारण आपण रंग शोधतोय, पण संवेदना विसरतोय.
माणसाला माणूस बनवण्यासाठी कोणता रंग द्यायचा, याचं उत्तर फार साधं आहे, "करुणेचा रंग", प्रामाणिकपणाचा रंग, आणि माणुसकीचा रंग. हे रंग फासले, तर वेगळा शेंदूर लागत नाही. ते आपोआप ओळखू येतात… वागण्यातून, शब्दांतून आणि नजरेतून.
आणि कदाचित तेव्हाच, दगडापेक्षा माणूस अधिक पूजनीय वाटू लागेल.
*सुनिल जाधव पुणे 9359850065,* topsunil@gmail.com
Comments
Post a Comment