चांगुलपणा हा व्यवहार नव्हे, ती स्वभावाची ओळख आहेशब्दरचना : सुनिल पुणेTM

चांगुलपणा हा व्यवहार नव्हे, ती स्वभावाची ओळख आहे
शब्दरचना : सुनिल पुणेTM

चांगुलपणा हा कधीच व्यवहाराचा भाग नसतो.
तो दुकानात मिळणारा माल ही नाही…की एखाद्या प्रसंगानुसार चढ-उतार करणारी चलनाची नोट वा शेअर मार्केट नाही.

चांगुलपणा हा स्वभाव असतो
जिथे मनाची शुद्धता, भावनेची निर्मळता
आणि विचारांची सुसंस्कृत दिशा लपलेली असते.

ज्या माणसाचं मन चांगलं असतं
त्याचे विचारही नेहमी उंच असतात.
त्याला कोणी कसं वागलं,
कोणी काय बोललं, कोणी किती दुखावलं
या गोष्टी त्याच्याकडून प्रतिक्रिया मागत नाहीत.

कारण चांगुलपणात एक अदृश्य शक्ती असते
जी आपलं वागणं इतरांवर अवलंबून न ठेवता
आपल्या मूल्यांवर, आपल्या संस्कारांवर टिकवून ठेवते.

म्हणूनच चांगला माणूस
वाईट माणसाशीही चांगलंच वागतो.
तो दुसऱ्याच्या कटुत्वाचा वार
आपल्या मनावर उतरतच देत नाही.
कारण त्याला माहीत असतं
आपण जे देतो, तेच परत आपल्याकडे येतं.
मग आपण कटुता का द्यावी?
दुःख का द्यावं? क्रोध का द्यावा?

चांगुलपणा म्हणजे कुणावर उपकार नाहीत,
तो म्हणजे स्वतःच्या मनाचा दर्जा उंच ठेवणे.
आपली ओळख वाईट लोकांनी नाही,
आपल्या स्वभावाने ठरू द्यावी,
ही चांगल्या माणसाची वृत्ती असते. कधी कधी लोक म्हणतात,
“इतक्या चांगुलपणाचा काय उपयोग?
लोक गैरफायदा घेतात!” पण चांगले लोक कधीच आपली ओळख बदलत नाहीत,
कारण त्यांचा चांगुलपणा हा
त्यांचा स्वभाव आहे,
व्यवहाराचा भाग नाही.

चांगुलपणा म्हणजे जिंकण्याची एक पद्धत आहे, 
शत्रू नव्हे, परिस्थिती;
द्वेष नव्हे, मन आहे;
आणि सर्वात महत्त्वाचं
स्वतःला जिंकन !

सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments