“रेषा…! एक दिसणारी पण न दिसणारी सीमा !” लेखन: सुनिल पुणे TM.
“रेषा…! एक दिसणारी पण न दिसणारी सीमा !”
लेखन: सुनिल पुणे TM.
"रेषा" दिसायला साधी, सरळ, लहानशी गोष्ट. पण तिच्यामागे दडलेला अर्थ, तिचं अस्तित्व आणि तिचा परिणाम आयुष्य बदलून टाकतो. खरंच, रेषा वाटते तेवढी क्षुल्लक गोष्ट नाही…
कपाळावरची रेषा असो वा हातावरची, ती आपल्या भविष्याची ओळ सांगते, आपल्या नशिबाची दिशा ठरवते. कपाळावर आली तर चिंता, कारण ती काळजीची, विचारांची खूण असते. काळ ओलांडत जातो आणि त्या रेषा खोल खोल कोरल्या जातात आयुष्याच्या अनुभवांनी, काळजीने आणि संघर्षांनी.
पण कागदावर आली तर आकृती, मग ती रेषा सौंदर्य निर्माण करते. कलाकाराच्या पेन्सिलमधून उमटणारी रेषा चित्राला अर्थ देते, रचनाकाराच्या कल्पनांना आकार देते. त्या रेषा नसत्या तर कल्पनेला मूर्त स्वरूप मिळालंच नसतं.
हातावर उमटली तर ती नशीब ठरते. कोणाच्या हातावर भाग्यरेषा लांब, कोणाच्या छोट्या पण त्या रेषांवर प्रत्येकाला आपल्या भविष्याची आशा असते. त्या रेषा आपल्या प्रयत्नांची, श्रद्धेची, आणि कधी कधी नियतीची कहाणी सांगतात.
जमिनीवर आली तर वाटणी… ही रेषा सर्वांत जास्त धोकादायक. कारण ती माणसांमध्ये सीमारेषा आखते जमीन विभागते, मालकी ठरवते, आणि अनेकदा मनं फोडते. हीच रेषा समाजात तंटे निर्माण करते, भाऊ भावात दरी घालते, आणि आपलेपणा नष्ट करते.
आणि सगळ्यात वेदनादायक संबंधात पडली तर दरी निर्माण करते. दोन मनांमध्ये पडलेली ही अदृश्य रेषा सर्वात घातक असते. एकेकाळी एकमेकांशिवाय राहू न शकणारे लोक, एका छोट्याशा गैरसमजुतीमुळे आयुष्यभर दूर राहतात. ही रेषा शब्दांनी नाही, पण अहंकाराने, अविश्वासाने आणि मौनाने उमटते.
रेषा म्हणजे शेवट नाही, तर मर्यादा ओळखण्याचा संकेत आहे. प्रत्येक रेषा आपल्याला सांगते
“इथेपर्यंत ये, पण ओलांडू नको.”
कलामध्ये ही मर्यादा सृजन बनते, पण नात्यांमध्ये ती दुरावा बनते.
म्हणूनच रेषा ओलांडायच्या नाहीत, पण समजून घ्यायच्या असतात. कारण कधी कधी एकच रेषा नातं वाचवते, तर एकच रेषा नातं संपवते.
रेषा आखा पण हृदयाच्या पलीकडे नाही… कारण प्रेम, आदर आणि आपलेपण यांना कोणत्याही रेषा रोखू शकत नाहीत.
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment