स्त्रीची मानसिकता आणि पुरुषांविषयीचा दृष्टिकोन” ( एक वास्तव सामाजिक मनोगत ) : सुनिल पुणेTM

“स्त्रीची मानसिकता आणि पुरुषांविषयीचा दृष्टिकोन”  ( एक वास्तव सामाजिक मनोगत ) : सुनिल पुणेTM 

आजचा समाज प्रगत झालाय, शिक्षण आणि समानतेची नवी दारे उघडली आहेत. स्त्रिया आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. तरीदेखील, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात अजून एक सावली कायम आहे ती म्हणजे पुरुषांविषयीचा सावधपणा.

बर्‍याचदा आपण बघतो जेव्हा एखाद्या स्त्रीची नव्या पुरुषाशी ओळख होते, मग तो ऑफिसमधला सहकारी असो, व्यवसायातील संपर्क असो किंवा सोशल मीडियावरील ओळख ती त्याला “भाऊ”, “दादा” म्हणून संबोधते. “सर” किवा नावाने संबोधणं तिला जड जातं.

हे फक्त एक संबोधन नसतं, तर तिच्या मनातील असुरक्षिततेची एक भिंत असते. ती म्हणते “भाऊ”, दादा, काका, मामा म्हणजे तिला वाटतं की समोरचा पुरुष आपोआप मर्यादा पाळेल. ती स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण समाजात काही वाईट अनुभव, काही अनपेक्षित प्रसंग पाहिलेले, ऐकलेले असतात त्यामुळे मनाने सावध राहणं हे तिचं स्वाभाविक आहे.

पण प्रश्न असा आहे या वागण्यामागे नेहमीच पुरुषांवर अविश्वास असतो का? उत्तर आहे नाही !
कधी कधी हे फक्त सावधतेचं कवच असतं, पण नकळत ते एखाद्या प्रामाणिक, सुसंस्कृत पुरुषाला दुखावून जातं. कारण प्रत्येक पुरुष स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतोच असं नाही. अनेक पुरुष स्त्रियांकडे एक सहकारी, एक सखी, एक मानवी व्यक्ती म्हणूनच पाहतात.

उदाहरणार्थ – एका ऑफिसमध्ये नवीन मॅनेजर येतो. सर्वजण त्याला “सर” म्हणतात, पण काही महिला त्याला “दादा” म्हणतात. ती स्त्री त्याचं वर्तन तपासत असते तिचा हेतू चुकीचा नसतो, पण त्याच्या मनात मात्र एक विचार उमटतो, “मी इतका अविश्वसनीय आहे का?”

एखाद्या ऑफिस क्षेत्रात, सोशल मीडियावरून भेटलेले किंवा काम करणारा कलाकार, ग्राहक म्हणून आलेल्या महिलांशी सन्मानाने वागतो, पण त्या प्रत्येकजण सुरुवातीला त्याला “भाऊ” दादा, काका म्हणतात. कारण त्या सुरक्षिततेची जाणीव गमवू इच्छित नाहीत.

एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थिनींना मुलीसारखं वागवतो, पण तरी त्या “सर” म्हणतानाही काहीशा अंतरावर राहतात.


ही उदाहरणं दाखवतात की समाजात अजूनही स्त्रीच्या मनात सुरक्षिततेची चिंता आहे. ती चुकीची नाही कारण समाजात काही वाईट अनुभवांनी तिचा विश्वास हादरवला आहे. पण त्याच समाजात असेही पुरुष आहेत जे सन्मान, संस्कार आणि प्रगल्भतेने वागतात.

खरं तर, नातं “भाऊ-दादा” अशा शब्दांवर नाही टिकत, तर परस्पर आदर, मर्यादा आणि विश्वासावर टिकतं.
जर प्रत्येक पुरुष स्त्रीकडे सन्मानाने पाहील, आणि प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुषाकडे अविश्वासाने नव्हे तर सावध विश्वासाने पाहील तर समाजातील संवाद अधिक संवेदनशील, सुंदर आणि सुसंस्कृत बनेल.

शेवटी, स्त्रीचा सावधपणा हा तिचा दोष नाही, आणि पुरुषाचा स्वाभिमान हा त्याचा अहंकार नाही हे समजून घेणं गरजेचं आहे.
कारण नाती टिकवणारी शक्ती ‘संशयात’ नसते, ती ‘आदरात’ असते.

सुनिल पुणेTM 9369850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?