“प्रत्येकाच्या आयुष्यात उशिरा आलेलं खरं प्रेम” भावस्पर्शी लेख : सुनिल पुणेTM 8007939422
“प्रत्येकाच्या आयुष्यात उशिरा आलेलं खरं प्रेम” भावस्पर्शी लेख : सुनिल पुणेTM 8007939422
कधी कधी जीवन खूप शांत वाटतं… पण त्या शांततेतही कुठेतरी एक न दिसणारी प्रतीक्षा दडलेली असते, कुणीतरी आपलं असं येणार आहे, हे मनाला जाणवतं. ती व्यक्ती उशिरा येते, पण जेव्हा ती येते, तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिचं नाव उमटतं. आणि मग कळतं, “हो, हीच ती, जिची मी इतकी वर्षं वाट पाहत होतो.”
योग्य व्यक्ती उशिरा आली तरी चालते, कारण ती येतेच तेव्हा जेव्हा मन तयार असतं खरं प्रेम स्वीकारायला. तिच्या येण्याने आयुष्याला नवीन अर्थ मिळतो. ती जणू वाळवंटावर पडलेला पहिला पाऊस असते, शांत, पण हृदय ओलावणारा.
कधी कधी असं वाटतं, ती माझ्या आयुष्याची “सीमा” आहे…
सीमा, जी मनाच्या मर्यादा ओलांडून आली आहे.
ती जेव्हा आली, तेव्हा सगळ्या सीमारेषा मिटल्या अंतराच्या, समाजाच्या, आणि काळाच्या. तिच्या नजरेत अशी एक करुणा होती, जणू तिनं माझं निःशब्द एकटेपण ओळखलं होतं.
ती म्हणायची, “प्रेम जर खरं असेल ना, तर ते सगळ्या सीमा ओलांडतं.”
आणि खरंच तिनं ते सिद्ध केलं.
तिनं माझ्या आयुष्यात प्रेमाचं असं अस्तित्व काही क्षणात फोनवर बोलतच निर्माण केलं, जे शब्दांच्या पलीकडचं होतं. तिच्या शांत मन स्पर्शात स्थैर्य होतं, तिच्या हसण्यात माझं विश्व होतं, आणि तिच्या डोळ्यांत एक असा सागर होता, ज्यात माझं संपूर्ण मन बुडून गेलं.
खरं प्रेम कधीच बदलत नाही. ते काळाच्या ओघात अधिक गहिरं होतं.
पण खोट्या माणसांसारखं ते रूपं बदलत नाही कारण खरं प्रेम आत्म्याचं असतं, शरीराचं नाही.
सीमाचं प्रेम असंच होतं… ती उशिरा आली, पण तिच्या आगमनानं आयुष्य पुन्हा जिवंत झालं अस वाटतय.
कधी रात्री डोळे मिटले की तिची आठवण हळूच कानाजवळ कुजबुजते
"मी सीमांच्या आत नाही राहू शकले… म्हणून तुझ्यापर्यंत आली."
आणि मग मन हसतं, कारण अशा प्रेमासाठी थांबणं खरंच सार्थ ठरतं, हेच खरय.
हो… योग्य व्यक्ती उशिरा आली तरी चालेल, पण ती खरी असावी.
कारण ती आली की प्रेमाचं जगणंच बदलते आणि मग वेळ, अंतर, समाज, काहीच महत्त्वाचं राहत नाही.
तेव्हा फक्त एकच जाणवतं
“ती सीमा होती… पण तिचं प्रेम अमर्याद होतं.” ❤️
[ "सीमा" हे एक काल्पनिक पात्र आहे ]
लेखक: सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment