मनातली राधा आणि मनातला कृष्ण

*माझे भाषण*

मनातली राधा आणि मनातला कृष्ण (भाषण लेखक:- सुनिल पुणेTM 8007939433)

नमस्कार ! "मान्यवर आणि सर्व मित्रांनो"....
प्रत्येकाच्या अंतःकरणात कुठेतरी एक राधा आणि एक कृष्ण असतोच.
ही भावना वय, नातं, किंवा जबाबदारी विचारत नाही.
कधी ती एका नजरेत दिसते,
कधी ती आयुष्यभर मनात शांतपणे राहते.

समाज राधा-कृष्णाचं नाव घेतो, त्यांची पूजा करतो,
त्यांच्या प्रेमावर भजनं गातो.
पण जेव्हा आजची राधा तिच्या कृष्णाशी काही भावना शेअर करते,
किंवा एखादा कृष्ण आपल्या राधेकडे ओढीनं पाहतो
तेव्हा तोच समाज त्यांनाच नावे ठेवतो.
हेच आपल्या काळाचं आजच वास्तव आहे…
भक्तीला मान्यता आहे, पण भावनांना नाही...का ?

राधा म्हणते, “मी विवाहित आहे, माझं आयुष्य स्थिर आहे. पण आत मनात कुठेतरी एक पोकळी आहे… एक शांत हाक आहे.
माझ्या मनातला कृष्ण मला समजून घेतो,
माझ्या शब्दांशिवाय माझ्या भावनांना ऐकतो.
त्याचं प्रेम माझ्या जीवनातलं पाप नाही हो !,
ते माझ्या अस्तित्वाचे आरसे आहेत.”

ती पुढे म्हणते, “मी समाजाला दोष देत नाही,
कारण समाज समजून घेईल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणा.
मी शांत आहे, पण माझं मौन दुर्बलतेचं नाही
ते माझ्या सहनशीलतेचं सौंदर्य आहे.”

आणि त्या कृष्णाचं मनोगतही तितकंच हळवं असतं.
तो म्हणतो, “मी विवाहित आहे, पण माझ्या मनातली राधा ही वेगळीच आहे.
ती माझ्या दिवसभरातील गोंधळातून मला बाहेर काढते,
माझ्या मनातल्या शांततेचा श्वास आहे ती.
मी तिच्यावर प्रेम करतो, पण त्या प्रेमाचं नाव ठेवता येत नाही.
ते प्रेम शरीराचं नाही, आत्म्याचं आहे.

समाज विचारतो, ‘हे बरोबर का चूक?’
पण मला माहित आहे
जे मनाला शांतता देतं, जे हृदयाला प्रसन्न करतं,
ते कधीच चुकीचं नसतं.”

राधा आणि कृष्णाचं नातं बांधिलकीचं नाही…
ती एक भावना आहे, समज आहे, ओढ आहे.
ते नजरेत नाही तर ते हृदयात आहे.
आजही अनेक राधा आहेत, ज्या हसतात पण आतून शांत असतात.
आणि अनेक कृष्ण आहेत, जे काही बोलत नाहीत, पण सगळं समजतात.

त्यांच्या नात्याला नाव नाही, पण अर्थ आहे.
त्यात पाप नाही, पण पवित्रता आहे.
ते जगासमोर नाही, पण मनाच्या आकाशात तेजोमय आहे.

म्हणूनच मित्रांनो,
प्रेम असो वा मैत्री, भावना असो वा आकर्षण
ती जपली जाते मनात, नजरेत नाही.
कारण खरी भावना कधीच गाजत नाही,
ती वाजत असते मनात…ती दरवळत असते श्वासात..
आणि ती समजली की माणूस खरोखरचा जग असतो.

कारण प्रत्येकाच्या सुप्त मनात एक राधा आणि एक कृष्ण असतोच…
फरक इतकाच
कुणी त्यांना ओळखतं, आणि कुणी त्यांना आयुष्यभर शोधतच राहतं…

भाषण सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?