पंगतीतलं मीठ आणि आयुष्यातली माणसं, सुनिल पुणेTM
पंगतीतलं मीठ आणि आयुष्यातली माणसं, सुनिल पुणेTM
पंगतीत जेवताना जर मीठ वाढायला चुकलं, तर पुन्हा ते परत मिळत नाही. त्याचप्रमाणे काही माणसंही असतात जी एकदा आपल्या आयुष्यातून निघून गेली की पुन्हा कधीच परत येत नाहीत. गंमत म्हणजे, त्यांची खरी किंमत आपल्याला बहुतेक वेळा ते गेल्यावरच समजते.
जेवणात गोड पदार्थ आला की आपलं सगळं लक्ष तिकडेच जातं. तो किती चविष्ट आहे, कशाच्या तुपात झालाय, त्याने त्रास होईल का नाही— या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक नसतात, पण तरीही मोहापायी तो गोड पदार्थ हवासा वाटतो. उलट, पानाच्या कडेला ठेवलेलं ते मीठ मात्र आपल्याला लक्षातही येत नाही. खारटपणा नकोसा वाटतो म्हणून आपणच त्याला दूर सारतो. अगदी ताटात रस्सा किंवा भाजी सांडली तरी ते मीठ असूनही निरुपयोगी ठरतं.
अगदी असंच आपल्या आयुष्यातल्या मीठासारख्या माणसांबाबत घडतं.
हे लोक आपल्याला परखड सल्ला देतात, आपलं चुकलं की प्रेमाने कान धरतात, पोटतिडकीने समजावतात. म्हणूनच ते अनेकदा नकोसे वाटतात. कारण त्यावेळी आपण गोड पदार्थाच्या मोहात अडकलोलेले असतो. बाकी सगळं दिसतं पण पानाच्या कडेवरचं ते थोडंसं मीठ मात्र दिसत नाही.
पण जेव्हा त्या गोड पदार्थाने जिभेला तड लागते, तेव्हा आपण लगेच पाण्याचा ग्लास शोधतो, त्यात लिंबाचा रस पिळतो आणि मग आपोआप हात मिठाकडे जातो. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणारच नाही.
म्हणूनच आयुष्यरूपी ताटात देवाने वाढून ठेवलेला प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो. आवडो वा न आवडो, प्रत्येक भेट मागच्या जन्माच्या नात्याची खूण असते. आणि आयुष्यातल्या मिठासारख्या माणसांना तर ओळखायलाच हवं. ते कदाचित फार महत्त्वाची भूमिका बजावणार नाहीत, पण एक नक्की ते आपलं वाईट कधीच करणार नाहीत.
लेखक सुनिल पुणे 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment