नाती विरघळत चाललीत... एक सामाजिक शोकांतिका

*नाती विरघळत चाललीत... एक सामाजिक शोकांतिका* सुनिल पुणेTM  8007939422

आजकालच्या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते  नातेसंबंधांमधली दरी दिवसेंदिवस वाढते आहे. पूर्वी नाती ही फक्त रक्ताच्या नाळीने जोडलेली नव्हती, तर त्या मागे आपुलकी, प्रेम, आपसूक निर्माण होणारी जबाबदारी होती. काका-काकू, मामा-मामी, आत्या, चुलत भावंडं  कुणीही अडचणीत असेल, दुःखात असेल तर घरातल्या माणसाप्रमाणे धावून यायचे. लग्न असो, बाळंतपण असो, बारसं असो किंवा मृत्यूचा प्रसंग  प्रत्येक ठिकाणी नाती एकत्र यायची आणि दुःख-सुख वाटून घ्यायची.

पण आज चित्र पूर्ण बदललं आहे. अलीकडेच ६ सप्टेंबर 2025. नाशिकला माझ्या लहान बहिणीचं दुःखद निधन झालं. अंत्यसंस्काराच्या वेळी मोजकेच लोक उपस्थित होते फक्त घरातील रक्तातील नात्यांची काका, काकू, आत्या,मामा मामी, बहीण भाऊ, काही शेजारीपाजारी व जवळचा मित्रपरिवार होता पण विस्तारित नातेसंबंधातील कुणी नव्हते. दुसऱ्या दिवशी अस्थी सावरण्याच्या विधीला तर फक्त घरातीलच माणसं होती. हे दृश्य पाहताना नकळत जुन्या काळातील दिवस आठवले. पूर्वी नात्यांच्या बंधनात जी ताकद होती, ती आज हळूहळू विरघळून चालली आहे.

या बदलाचं मोठं कारण म्हणजे डिजिटल दुनियेचं मोहजाल. आज लोक मोबाईलमध्ये एवढे गुंतले आहेत की प्रत्यक्ष भेटणं, सोबत वेळ घालवणं, नात्यांचा उबदारपणा अनुभवणं  हे दुय्यम झालंय. कुणाच्या मृत्यूवर प्रत्यक्ष हजर राहण्याऐवजी, सोशल मीडियावर दोन ओळींची "भावपूर्ण श्रद्धांजली" टाकणं पुरेसं वाटतं. पण खरी गोष्ट अशी आहे की त्या दोन ओळींनी नाती निभावत नाहीत, दुःख हलकं होत नाही.

या मागे आणखी एक कारण आहे पैसा कमवण्याची अंध स्पर्धा. पैसा आवश्यक आहेच, पण त्याच्या नादात लोक नाती हरवून बसलेत. पूर्वी वाड्यावरील लग्न असो, गावातली पंगत असो किंवा कुणाच्या घरी सण-वार असो  शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र जमायचे. पंगतीत बसून जेवायचं, रात्री उशिरापर्यंत गप्पा-टप्पा व्हायच्या, मुलं एकत्र खेळायची, ज्येष्ठ मंडळी अनुभव सांगायची. त्या वातावरणात नात्यांची वीण घट्ट होत गेली. आज मात्र या सगळ्याला सोशल मीडियाने आणि व्यस्त जीवनशैलीने गिळलं आहे. नात्यांचा अर्थ लोकांच्या डोक्यात "फ्रेंडलिस्ट" आणि "फॉलोअर्स" इतकाच उरला आहे. हळूहळू असं झालं तर येणाऱ्या पिढ्यांना खऱ्या नात्यांची किंमतच कळणार नाही. त्यांच्यासाठी "नातं" म्हणजे फक्त स्क्रीनवरील नाव.

ही परिस्थिती पुढील काळासाठी नक्कीच एक सामाजिक शोकांतिका आहे. आज आपण वेळेत जागं झालो नाही, तर उद्या आपली पिढी नात्यांच्या उबेशिवाय, एकटेपणात जगेल.

म्हणूनच आजची जबाबदारी आपली आहे. पैसा कमवा, करिअर करा, प्रगती करा  पण त्यासोबत नाती जपा. आई-वडील, भावंडं, नातेवाईक, मित्र, शेजारी  सगळ्यांसाठी वेळ काढा. भेटा, गप्पा मारा, त्यांचं दुःख-सुख ऐका. कारण शेवटी स्मशानात पैशाचे बंडल कुणी सोबत आणत नाही, पण नातेवाईकांच्या डोळ्यातले अश्रू आणि आठवणी मात्र खरी कमाई ठरतात.

नाती म्हणजे संपत्ती. त्यांना पैशाने विकत घेता येत नाही, पण वेळ, प्रेम आणि आपुलकीने नक्कीच टिकवता येतात. अजून वेळ आहे चला तर, आपण नाती जपूया.

आपबिती लेखन सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"