सुचलेल्या आणि चुकलेल्या गोष्टी लिहून ठेवण्याची माझी सवय
*सुचलेल्या आणि चुकलेल्या गोष्टी लिहून ठेवण्याची माझी सवय*
लेखक सुनिल पुणे TM 8007939422
जीवनात काही क्षण असे येतात जे आपल्या मनावर कायमचा ठसा उमटवून जातात. पण जर आपण त्या क्षणांना शब्दांत पकडलं नाही, तर ते नुसतेच आठवणींच्या धुक्यात हरवून जातात. एखादी चांगली कल्पना सुचली, एखादी चूक घडली, किंवा एखादा अनुभव मनाला भिडला त्या वेळेला लिहून ठेवणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं खरं जतन करणं होय.
माझ्या आयुष्यातील पहिला परदेश प्रवास हाच या गोष्टीचा सर्वात मोठा पुरावा आहे.
जर्मनीत पोहोचलो तेव्हा तिथल्या शिस्तीने अक्षरशः थक्क झालो होतो. रेल्वे, बस, अगदी छोट्या दुकानदारापर्यंत वेळेची काटेकोरता आणि जबाबदारीचं भान प्रत्येक ठिकाणी जाणवत होतं. एकदा रेल्वे स्टेशनवर मी थोडा उशिरा पोहोचलो आणि माझ्या डोळ्यासमोर गाडी मिनिटाच्या काट्यावर निघून गेली. त्या क्षणी ठरवलं की, “आपल्या जीवनात वेळेचं मूल्य कायम पाळायचं.” पण हाच विचार मी लगेच वहीत लिहून ठेवला नाही. वर्षांनंतर जाणवलं तो अनुभव जर मी शब्दांत पकडला असता, तर तो निर्धार कायम माझ्या डोळ्यासमोर राहिला असता.
फ्रान्समध्ये तर मनाने वेगळंच विश्व अनुभवलं. पॅरिसच्या रस्त्यांवर फिरताना प्रत्येक वास्तू, प्रत्येक कोपऱ्यातून झळकणारं सौंदर्य मला भारावून टाकत होतं. आणि मग तो अविस्मरणीय क्षण होता आयफेल टॉवर उंच 328 मीटरवर उभे राहण्याचा!
संध्याकाळच्या अंधारात जेव्हा तो सोनेरी प्रकाशात उजळून निघाला, तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला “जगण्याची खरी उंची ही बाहेरच्या वास्तूत नाही, ती आतल्या विचारांत आहे.” त्या क्षणी मनाला जे वाटलं ते लिहून ठेवलं असतं, तर आज तो अनुभव अधिक जिवंत राहिला असता.
मलेशियामध्ये लोकांच्या जगण्याचा उत्साह मला खूप शिकवून गेला. तिथल्या बाजारात, रस्त्यावर, अगदी साध्या कामांतही लोक आनंद शोधत होते. “माणसाने कुठेही असलं तरी त्याच्या कामाचा आनंद घेणं ही खरी श्रीमंती आहे” हा विचार तिथे माझ्या मनात घट्ट बसला. पण तेव्हाही तो विचार लिहून ठेवण्याचा मी विलंब केला. आज तो धूसर आठवतो, पण लिहिलेला असता तर माझ्या आयुष्याचा तो पथदर्शक ठरला असता.
या तिन्ही देशांनी मला अमूल्य शिकवण दिली, पण त्यातील बरंच काही शब्दांत पकडता आलं नाही, म्हणून आज त्या आठवणी जरी गोड आहेत तरी अपूर्ण भासतात.
आता मला उमजलं आहेच, लिहिणं म्हणजे क्षणाला कायमस्वरूपी जिवंत ठेवणं. विचार चमकला की लगेच टिपावा, चूक घडली की नोंदवावी. कारण लिहिलेलं कधीच हरवत नाही, ते आपल्याला पुढच्या प्रवासात मार्ग दाखवतं.
म्हणूनच मी मनापासून सांगतो की, सुचलेल्या आणि चुकलेल्या गोष्टी भान असतानाच लिहून ठेवा. अन्यथा त्या क्षणांचं खरं मूल्य फक्त पश्चातापाच्या रूपात उरतं.
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment