बापाचा हात कायम हातात धरला तर, जगात कोणाचे ही पाय धरायची गरजच पडत नाही
*बापाचा हात कायम हातात धरला तर, जगात कोणाचे ही पाय धरायची गरजच पडत नाही*
लेखक : सुनिल पुणे TM 8007939422
"बाप"... या शब्दातच एवढं सामर्थ्य आहे की ज्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. आपण जन्मतो, पावलं टाकतो, बोलायला शिकतो, शिक्षण घेतो, मोठं होतो, पण या प्रत्येक टप्प्यावर एक सावली आपल्यासोबत असते कायम.. ती म्हणजे बापाची सावली. आणि म्हणूनच मी म्हणतो, *"बापाचा हात कायम हातात धरला तर, जगात कोणाचेही पाय धरायची गरजच पडत नाही."*
बाप म्हणजे फक्त पोट भरणारा, खर्च पुरवणारा, शिस्त लावणारा माणूस नाही. तो आपल्या मुलांच्या आयुष्याचा पहिला शिक्षक असतो, मार्गदर्शक असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधारस्तंभ असतो. अनेक वेळा आपण बापाकडे पाहतो तेव्हा तो कमी बोलणारा, कठोर वाटणारा माणूस दिसतो. पण त्याच्या नजरेत, त्याच्या कष्टात आणि त्याच्या प्रत्येक कृतीत एकच गोष्ट असते ती म्हणजे आपल्या लेकरांचं सुख. बापाचा हात म्हणजे आत्मविश्वास. छोटं मूल जेव्हा पहिल्यांदा उभं राहतं, तेव्हा कोणाचा आधार घेतं? तर बापाचा. जेव्हा आयुष्यात एखादं अपयश येतं, तेव्हा आपल्या खांद्यावर कोणाचा हात हवा असतो ? तर बापाचा. आणि जेव्हा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा जरी तो निर्णय स्वतः घ्यायचा असला तरी मनात आपण एक विचार करतो की बाप काय म्हणेल?
मी असं का म्हणतो की बापाचा हात धरला की कोणाचे पाय धरायची गरज नाही? कारण बाप हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे की जो तुमच्या शिक्षणासाठी स्वतःच्या गरजा मागे टाकतो. तुमच्या लग्नासाठी कर्ज काढतो. तुमचं घर बसवण्यासाठी आपलं निवृत्तीचं भांडवल खर्च करतो. आणि ही सर्व गोष्ट करताना एक क्षणसुद्धा मागे पाहत नाही. कारण त्याचं आयुष्य म्हणजे त्याची मुलं. तो आपल्या स्वप्नांमध्ये काही स्वप्न पाहतोच, पण ती स्वप्नं त्याच्या मुलांच्या डोळ्यात असतात.
बापाच्या हातात एवढं सामर्थ्य असतं की तो आपल्याला कोसळू देत नाही. बापच तो असतो जो मुलगा रडत असताना स्वतःला सावरतो, त्याला घट्ट मिठी मारतो, आणि म्हणतो अरे बबड्या.. “मी आहे ना, काळजी नको.” आयुष्याच्या वळणावर आपण अनेकवेळा कोसळतो, पण बाप असतो म्हणूनच आपण परत उभं राहतो.
आजच्या काळात अनेकजण लवकरच मोठं होण्याचा ध्यास घेतात. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागतात. मित्र, गुरु, युट्यूब, कोचिंग क्लास इतरत्र..सगळीकडून सल्ले घेतात. पण त्याच वेळी विसरतात की घरातच एक कोच आहे, एक गुरु आहे जो आपला बाप आहे. ज्या दिवशी आपण हे लक्षात ठेवतो, त्या दिवशी जग जिंकल्यासारखं वाटतं. कारण बापाच्या अनुभवाचा काही तोडच नाही.
बापाचा हात धरलेला असेल तर तुम्हाला कोणाच्या समोर झुकावं लागत नाही. तुम्ही आत्मसन्मानाने जगता. बापाच्या शिकवणीतून आणि त्याच्या बळावर तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः तयार करता. बाप तुमच्यासाठी एक सावली आहे, जी उन्हातसुद्धा तुम्हाला थंडावा देते. एक वारा आहे, जो गरज पडेल तेव्हा पाठबळ देतो. एक भिंत आहे, जी संकटांपासून वाचवते.
बापाच्या हातात एक जादू असते की.. तो हात धरला की जगाच्या कोणत्याही अडचणी छोट्याशा वाटतात. कारण तुम्हाला माहित असतं, की “हा माणूस माझ्यासोबत आहे.” आणि हे भावनिक समर्थनच इतकं प्रबळ असतं की तुम्ही कोणाही समोर झुकत नाही, कोणाचे पाय धरावे लागत नाहीत. कारण एकदा बापाच्या संस्कारांनी तुम्हाला घडवलं की तुम्ही स्वतः इतके सक्षम होता की जग तुम्हाला झुकून सलाम करतं.
आज अनेक लोक यशस्वी होतात, मोठं नाव कमावतात. पण काही जण हे विसरतात की त्यांच्या पाठीमागे कोण होता जो त्यांच्या प्रत्येक अपयशात त्यांना सावरत होता तर त्यांचा बाप. आपण कितीही मोठे झालो तरी बापाच्या कर्जातून मुक्त होऊ शकत नाही. त्याचं आपल्यावरचं प्रेम, त्याचे कष्ट, त्याचा त्याग, याचं मोजमापच नाही. माझं असं स्पष्ट मत आहे की जर आपण आयुष्यभर बापाचा हात हातात धरून ठेवला, त्याचे संस्कार, त्याची शिकवण, त्याचं मार्गदर्शन, हे आपल्यासोबत ठेवलं, तर कोणत्याही दारात नमतेने जावं लागणार नाही. आपली मान उंच राहते. कारण आपण एका अशा व्यक्तीचा हात हातात धरलेला असतो जो स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून आपल्या स्वप्नांचा उगम ठरतो.
बाप म्हणजे फक्त जन्मदाता नव्हे, तो आयुष्यदाता आहे. तो एक शिकवण आहे, एक शिस्त आहे, एक प्रेरणा आहे. तो जगातला एकमेव माणूस आहे जो तुम्हाला अपयशी बघू शकतो, पण तुमचं दु:ख पाहू शकत नाही. त्याचं प्रेम व्यक्त होत नाही, पण त्याच्या कृतीतून त्याचं मोल कळतं.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की
बाप हा तो दीपस्तंभ आहे, जो स्वतः जळूनही आपल्या मुलांच्या मार्गाला प्रकाश देतो.
त्याचा हात जर हातात असेल, तर कोणत्याही वादळाला सामोरं जाता येतं.
आणि म्हणूनच तुम्ही “बापाचा हात कायम हातात धरला तर, जगात कोणाचेही पाय धरायची गरजच पडत नाही.”
लेखक सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment